मुंबई: शहरातील लोकलसेवा बंद असल्यामुळे वाहतुकीचा संपूर्ण भार वाहणाऱ्या बेस्ट सेवेतील कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आज बेस्टच्या आणखी नऊ कर्मचाऱ्यांना कोरोनाची (Coroanvirus) बाधा झाल्याचे समोर झाले. त्यामुळे बेस्टमधील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १३७ इतका झाला आहे. आतापर्यंत बेस्टच्या आठ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कालच बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीने संपाची हाक दिली होती. महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही विमा संरक्षण मिळावे. मृत कर्मचाऱ्यांच्या नातलगांना शासन योग्य आर्थिक मोबदला देत असल्याचा आरोप बेस्ट कर्मचारी कृती समितीने केला होता. तसेच बेस्टच्या कर्मचाऱ्यांची दररोज कोरोना टेस्ट केली जावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्याशिवाय, कर्मचाऱ्यांनी कामावर जाऊ नये, असे बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीकडून सांगण्यात आले होते.
Lockdown 4.0: वाचा राज्यात काय सुरु आणि काय बंद राहणार?
मात्र, सोमवारी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जबाबदारीचे भान ठेवत संपावर जाणे टाळले. त्यामुळे मुंबईत वाहतुकीचा प्रश्न उद्भवला नव्हता. मात्र, कोरोनाग्रस्त बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
धारावीत कोरोनाचे २६ रुग्ण वाढले
धारावीत मंगळवारी कोरोनाचे २६ नवे रुग्ण मिळाले. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १३५३ इतका झाला आहे. तर माहिमध्ये १३ नवे रुग्ण आढळले असून येथील एकूण रुग्णसंख्या २३४ इतकी झाली आहे. त्यापाठोपाठ दादर परिसरात मंगळवारी कोरोनाचे आणखी तीन रुग्ण मिळाले. त्यामुळे दादरमधील कोरोनाबाधितांचा आकडा १७६ इतका झाला आहे.