मुंबई : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या घातक व्हेरियंटचा भारताती शिरकाव झाला आहे. कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे 2 रुग्ण सापडले आहेत. त्या दोघांना बंगळुरू विमानतळावरून थेट पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवण्यात आलं. तिथंच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ओमायक्रॉन महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन ठेपल्यानं महाराष्ट्राचीही चिंता वाढली आहे
6 प्रवाशांच्या अहवालाची प्रतीक्षा
दक्षिण आफ्रिकेसह इतर आफ्रिकन देशातून महाराष्ट्रात आलेले 6 प्रवासी कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आलेत. त्या नमुन्यांमध्ये काय आढळतं, याकडं अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
या 6 प्रवाशांमुळं अख्खा महाराष्ट्र गॅसवर आहे. कल्याण डोंबिवली, मुंबई, मीरा भाईंदर, पुणे या भागात अफ्रिका खंडातून आलेले प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये नायजेरियातून आलेले दोघे पॉझिटिव्ह आढळले आहेत.
आणखी 4 जण कोरोना पॉझिटिव्ह
दरम्यान, दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज आणखी चार जण कोरोना पॉझिटिव्ह (omicron) आढळून आले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत असलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे.
भारताने ओमायक्रोन चा संसर्ग असलेल्या धोकादायक देशांची यादी जारी केली. यात दक्षिण आफ्रिकेसह यूरोपातील देशांचा समावेश आहे. आता ओमायक्रोनचा संसर्ग असलेल्या धोकादायक देशांमधून आलेले चार प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे.