VIDEO: विहिरीत पडलेल्या महिलांची जीव वाचवण्यासाठीची शेवटची धडपड

या प्रसंगाचा हदयद्रावक व्हीडिओ समोर आला आहे

Updated: Oct 2, 2018, 09:13 PM IST

मुंबई: विलेपार्ले परिसरात मंगळवारी संध्याकाळी कठडा कोसळून महिला विहिरीत पडल्याची दुर्घटना घडली. फिरोजशहा मेहता मार्गावरील रूईया बंगल्याच्या आवारात हा प्रकार घडला. या घटनेचा हदयद्रावक व्हीडिओ आता समोर आला आहे. या व्हीडिओत विहिरीत पडल्यानंतर जीव वाचवण्यासाठी महिला आकांत करताना दिसत आहेत. यावेळी काठावर असलेल्या महिलांनी आपल्या साड्यांचे पदर विहिरीत सोडून या महिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. चार ते पाच महिला साडीच्या पदराला धरून पाण्यावर तरंगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. 

ही घटना घडल्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांना याठिकाणी पोहोचायला वेळ लागला. दरम्यानच्या काळात विहिरीत पडलेल्या महिलांना जीव वाचविण्यासाठी कोणताच पर्याय दिसत नव्हता.
 
ही विहीर बरीच खोल असल्याने कोणीही आतमध्ये उतरण्याचे धाडसही करत नव्हते. त्यामुळे या महिला आपला जीव वाचवण्यासाठी आकांत करताना दिसत होत्या. 

गेल्या तीन तासांपासून अग्निशमन दलाचे जवान विहिरीत उतरून बचावकार्य करत आहेत. 

मात्र, दुर्देवाने आतापर्यंत तिघांचे मृतदेह हाती लागले असून यामध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. 

विहिरीतील पाणी उपसण्यासाठी पंप लावण्यात आले आहेत. अंधार पडल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहे. मात्र, फ्लडलाईटस लावून अग्निशमन दलाचे जवान विहिरीत उर्वरित महिलांचा शोध घेत आहेत.