26/11 Mumbai attack: आजच दहशतवादी हल्ल्याने हादरली होती मुंबई!

या दिवशी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सीमेपलीकडून आलेल्या काही दहशतवाद्यांनी केलेला तांडव कोणताही भारतीय विसरू शकत नाही. 

Updated: Nov 26, 2021, 10:20 AM IST
26/11 Mumbai attack: आजच दहशतवादी हल्ल्याने हादरली होती मुंबई! title=

मुंबई : मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज 13 वर्षे पूर्ण होत आहेत. या दिवशी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सीमेपलीकडून आलेल्या काही दहशतवाद्यांनी केलेला तांडव कोणताही भारतीय विसरू शकत नाही. 26 नोव्हेंबर 2008 हा तो दिवस होता जेव्हा संपूर्ण देश मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने हादरला होता.  दहशतवाद्यांनी मायानगरीला मृतदेहांचं शहर कसं केलं होतं? आणि नेमकं 13 वर्षांपूर्वी काय घडलं होतं जाणून घेऊया.

26 नोव्हेंबर 2008 ची ती संध्याकाळ होती. स्वप्नांची नगरी, मुंबई त्याच्या शिखरावर होती. दररोज सायंकाळप्रमाणे आजही संध्याकाळ अशीच होती आणि अचानक गोळ्यांच्या आवाजाने परिसर हादरला. सीमेपलीकडून दहशतवाद्यांकडून  गोळ्या झाडल्या जात आहेत, याची कुणालाही कल्पना नव्हती. 

मुंबई हल्ल्याची सुरुवात लिओपोल्ड कॅफे आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) इथून झाली. हा हल्ला एवढा मोठा असू शकतो, याची सुरुवातीला कुणालाही कल्पना नव्हती. पण हळूहळू मुंबईच्या इतर भागातून बॉम्बस्फोट आणि गोळीबाराच्या बातम्या येऊ लागल्या. मध्यरात्रीपर्यंत मुंबई शहरात दहशतीचा परिणाम दिसून आला.

मुंबईतील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक असलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवर दहशतीचा तांडव सुरू झाला. स्थानकावर रक्तरंजित खेळ होणार आहे, याची कल्पना तिथे उपस्थित असलेल्या एकाही प्रवाशाला नव्हती. यावेळी मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते. दोन दहशतवादी तिथे पोहोचले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि हँडग्रेनेडही फेकले. 

यामध्ये 58 निष्पाप प्रवासी मृत्यूच्या कचाट्यात सापडले. तर चेंगराचेंगरीत अनेक जण गोळी लागल्याने जखमी होऊन पडले. अजमल अमीर कसाब आणि इस्माईल खान नावाच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता.

छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाशिवाय दक्षिण मुंबईतील ताज हॉटेल, हॉटेल ओबेरॉय, लिओपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल आणि अनेक ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ले सुरू केले होते. मध्यरात्रीपर्यंत मुंबईतील अनेक भागात हल्ले होत होते. 

शहरात चार ठिकाणी चकमक सुरू होती. पोलिसांशिवाय निमलष्करी दलही मदतीसाठी पुढे आले होते. एकाच वेळी अनेक ठिकाणी झालेल्या हल्ल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे दहशतवाद्यांच्या संख्येचा अंदाज बांधणं कठीण होत होतं.

26 नोव्हेंबरच्या रात्री दहशतवाद्यांनी ताज हॉटेलकडे आपला मोर्चा वळवला. यावेळी दहशतवाद्यांनी सात परदेशी नागरिकांसह अनेक पाहुण्यांना ओलीस ठेवलं होतं. इतकंच नाही तर ताज हॉटेलच्या हेरिटेज विंगला आग लावली. 27 नोव्हेंबरला सकाळी एनएसजी कमांडो दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी पोहोचले होते.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये गोळीबारी करणारा दहशतवादी अजमल अमीर कसाब याला चकमकीनंतर ताडदेव परिसरातून जिवंत पकडण्यात आलं. तो जबर जखमी झाला होता. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानचा दहशतवादी कारस्थान उघड केला होता. मारले गेलेल्या त्याच्या साथीदारांची नावं त्याने उघड केली होती. नंतर कसाबवर खटला चालवला गेला आणि नंतर त्याला फाशीची शिक्षा झाली.