मध्य रेल्वेवर १ नोव्हेंबरपासून १६ वाढीव फेऱ्या

 पश्चिम रेल्वे, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर गेल्या महिन्यात जादा फेऱ्या सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १ नोव्हेंबरपासून गर्दीच्या वेळेत १६ वाढीव फेऱ्या सुरू होणार आहेत. या सर्व लोकल ठाण्यापुढील प्रवाशांसाठी आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 11, 2017, 09:57 AM IST
मध्य रेल्वेवर १ नोव्हेंबरपासून १६ वाढीव फेऱ्या  title=

मुंबई : पश्चिम रेल्वे, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर गेल्या महिन्यात जादा फेऱ्या सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १ नोव्हेंबरपासून गर्दीच्या वेळेत १६ वाढीव फेऱ्या सुरू होणार आहेत. या सर्व लोकल ठाण्यापुढील प्रवाशांसाठी आहेत.

दादर-बदलापूर एक जाणारी एक येणारी फेरी, दादर-टिटवाळा एक जाणारी एक येणारी फेरी, दादर-डोंबिवली तीन जाणाऱ्या तीन येणाऱ्या फेऱ्या, कुर्ला-कल्याण तीन-तीन येणाऱ्या फेऱ्या अशा 16 वाढीव फेऱ्या असतील. या वाढीव गाड्यांमध्ये महिलांसाठी तीन जादा डबे राखीव असतील.

मध्य रेल्वेवर गर्दीच्यावेळी प्रवाशांचे हाल होतात. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. प्रवाशांच्या मागणीनंतर जादा गाड्यांच्या फेऱ्या सुरू व्हाव्यात यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या प्रयत्नाला यश आलेय.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची एक संयुक्त बैठक झाली. त्या बैठकीत या वाढीव फेऱ्या मंजूर झाल्या असून १ नोव्हेंबरपासून सुरू होतील, असे माहिती महाव्यवस्थापकांनी दिली. 

अंबरनाथ स्थानकातील वाढत्या गर्दीवर लक्षात घेऊन खा. डॉ. शिंदे यांनी अंबरनाथ स्थानकात पश्चिम दिशेला होम प्लॅटफॉर्म बांधण्याची मागणी केली होती. त्याबाबतही या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. अंबरनाथवासीयांना लवकरच नवा होम प्लॅटफॉर्म, ४ एस्कलेटर्स, नवा एफओबी आणि रेल्वेची नवी इमारत मिळणार आहे. 

मुंबई दिशेकडील एफओबीचाही विस्तार करण्यात येणार आहे. तर होम प्लॅटफॉर्म एमयूटीपी ३ अंतर्गत केला जाणार आहे. त्यासाठी जागतिक बँकेची मंजुरी एक-दोन दिवसांत अपेक्षित असल्याची माहिती देण्यात आलेय. या कामाला लवकरच सुरुवातही होईल, असे सांगण्यात आलेय.