अहमदनगर: काही वर्षांपूर्वी दुष्काळाची पाहणी करण्यासाठी पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी या कर्जत-जामखेडमध्ये आल्या होत्या. मात्र, यावेळच्या निवडणुकीत तुम्ही रोहित पवारांना निवडून दिल्यास पुढील काळात येथील विकासकामे पाहायला पंतप्रधान मोदी येतील, हा माझा शब्द आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले. ते शनिवारी रोहित पवार यांच्या प्रचारासाठी कर्जत-जामखेड मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलत होते.
भर पावसात शरद पवारांची सभा : ‘वारं फिरलंय, इतिहास घडणार’
यावेळी पवारांनी येत्या २४ तारखेला कर्जत-जामखेडमधून रोहित पवार हेच निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्रात सध्या कर्जत-जामखेडची चर्चा सुरु आहे. इथल्या तरुणांनी भाजपची झोप उडवली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री तीन-तीन सभा कर्जत-जामखेडमध्ये घेत आहेत. परंतु, जनतेचा सध्याचा प्रतिसाद पाहता कर्जत-जामखेडमध्ये २४ तारखेनंतर भाजपचा राम शिल्लक राहणार नाही, असा दावाही पवार यांनी केला.
साताऱ्यात भर पावसात शरद पवारांची सभा
५२ वर्षांपूर्वी आज रोहित ज्या वयात आहे त्या वयात मी विधानसभेला उभा होतो. बारामतीमध्ये त्यावेळी काही नव्हते. त्या गावाचा चेहरा बदलण्याची संधी मिळाली. परिवर्तन झालं. त्याप्रमाणेच रोहित पाच वर्षांत अनेक विकासकामे, प्रकल्प या भागासाठी उभे करेल. बारामतीत विकास व्हायला २० वर्षे लागली. परंतु, रोहितला साथ लाभली तर तो कर्जत-जामखेडमध्ये तोच विकास पाच वर्षात करून दाखवेल, असेही यावेळी पवारांनी सांगितले.
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार हे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या दोन हात करत आहेत. राम शिंदे यांना निवडून आणण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर दुसरीकडे रोहित पवार हेदेखील कंबर कसून मैदानात उतरले आहेत. त्यामुळे यंदा कर्जत-जामखेडची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.