महाराज शिवलिंग शिवाचार्य खरंच समाधी घेणार होते का?

लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर येथील लिंगायत समाजाचे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या जिवंत समाधीच्या अफवेने मोठी खळबळ उडाली होती. 

Updated: Aug 29, 2020, 11:27 AM IST
महाराज शिवलिंग शिवाचार्य खरंच समाधी घेणार होते का?  title=

शशिकांत पाटील, झी मिडीया, लातूर: राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर हे खरंच समाधी घेणार होते का ? का ही निव्वळ अफवा होती ? असा प्रश्न आता महाराजांच्या एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे निर्माण झाला आहे. या विडिओच्या आधारेच वीरशैव शिवा संघटनेचे प्रमुख प्रा. मनोहर धोंडे यांनी महाराजांना आत्महत्येस प्रवृत्त केला जात असल्याचा खळबळजनक आरोप पोलीस महासंचालकांकडे दिलेल्या पत्रात केला आहे.
लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर येथील लिंगायत समाजाचे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या जिवंत समाधीच्या अफवेने मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांचे महाराष्ट्रासह अनेक राज्यातील भाविक हे कोरोना काळात अहमदपूर येथील महाराजांच्या मठात गर्दी करू लागले होते. मात्र महाराजांच्या एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे महाराज खरंच समाधी घेणार होते का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा व्हिडिओ 'झी २४ तास'च्या ही हाती लागला आहे.  

या व्हिडिओमध्ये महाराज हे पलंगावर झोपून आहेत. अंगावर पांघरुण असून डोक्यावर मोठा लांब रुमाल आहे. तर महाराजांच्या नाकाला ऑक्सिजनही लावलेले आहे. तर महाराजांच्या डाव्या हाताला सलाईन लावलेल्या पट्ट्या दिसत आहेत. यावेळी एक मुलगा महाराजांच्या हातातील सोन्याची अंगठी काढत असून यावेळी नेमका काय संवाद झालाय ते पाहुयात.

अज्ञात व्यक्ती - राहू द्या

 लहान मुलगा - काढू नका म्हणायले आहेत. 

महाराज - का ?

अज्ञात व्यक्ती - तुम्हीच म्हणाला होतात की थोडं तर राहू द्या अंगावर द्या. 

महाराज - हसतात.... 

अज्ञात व्यक्ती - थोडं तर राहू द्या सोबत तुमच्या राहूद्या. 

अज्ञात व्यक्ती - अंत्यविधीचे विचारा, अंत्यविधीचे विचारा. ते महत्वाचं आहे आता. 

प्रश्न विचारणारा --  'अंत्यविधी आज करायचा ? उद्या ? अंत्यविधी ? संस्कार कवा करायचा ? संस्कार ? तिथे समाधी... 

डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज : 'समाधी... आम्ही आता मध्ये गेलो की तुम्हाला काय करायचे ते करा.. आम्हाला नेऊन बसवतात. पुष्पांजली टाकली की पुढे काय करायचे ते ठरवा...

अज्ञात व्यक्ती - बरं बरं... आपल्या मनावर. 

दुसरा अज्ञात व्यक्ती - तुम्ही जे योग्य वाटतं ते करा. म्हणजे लोकं दर्शन तर घेतील. 

दुसरा व्यक्ती - काढा काढा तसाच व्हिडिओ काढा. 

महाराज - आमचा उत्तराधिकारी बसलाय. 

अज्ञात व्यक्ती - मी करतो मी करतो अप्पा. 

तिसरा अज्ञात व्यक्ती - फोटो घ्या फोटो घ्या. 

या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगाही दिसत असून राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज त्या मुलाला आपला उत्तराधिकारी म्हणतानाही दिसून येत आहे. या व्हिडिओमधून खरंच महाराज समाधी घेणार होते का ? का महाराजांवर कुणाचा दबाव होता का ? अंत्यविधी कधी करायचा ? असा प्रश्न विचारणारे ते व्हिडिओमधील व्यक्ती कोण ? असे एक ना अनेक प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत. तर दुसरीकडे 'शिवा' अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे प्रमुख असलेले प्रा. मनोहर धोंडे यांनी ही महाराजांना काही जण आत्महत्येस प्रवृत्त करीत असल्याचा खळबळजनक आरोप केलाय. तसे पत्रच त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक, लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अहमदपूर पोलीस ठाण्यातही दिलंय. 

यामध्ये धोंडे यांनी अहमदपूरच्या भक्तिस्थळ विश्वस्त मंडळ, अहमदपूरचे वीरशैव लिंगायत मठावर आरोप केले आहेत. ज्यात काही शासकीय अधिकाऱ्यांची नावे धोंडे यांनी पत्रात घेतली आहेत. ज्यात हिंगोलीचे सीईओ रामदास पाटील, माधवराव अण्णाराव बरगे, सुभाषअप्पा वैजनाथ सराफ, बब्रुवान हैबतपुरे, वेंकट गंगाधरराव मुद्धे, शिवशंकर कल्याणी, शिवशंकर बळीराम मोरगे, शिलाताई माळोदे, महावीर सेवाकरी यांच्यावर महाराजांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केलाय. 

१०४ वर्षांच्या महाराजांचे सेवाकार्य हे मोठं आहे. महाराज अखंड भारत असताना आताच्या पाकिस्तानमधील लाहौर मधून त्यांनी स्वतंत्र्यापूर्वी एमबीबीएस पूर्ण केलं आहे. तर दर महिन्यातील श्रावणमधील अनुष्ठानसाठी अनेक भाविक अहमदपूरला येत असत. मात्र यावर्षी श्रावणात कोरोनामुळे ते शक्य झालं नाही. मुळात महाराजांचा मोठा भक्तवर्ग महाराष्ट्रासह, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात असून महाराज समाधी घेणार असल्याचे कळल्यामुळेच हजारो भाविक अहमदपूरच्या भक्ती स्थळी दाखल झाले होते. त्यामुळे महाराज समाधी घेणार ही अफवा नेमकी कोणी पसरवली ? इतके भाविक गोळा करण्यामागे कुणाचा काय उद्देश ? शिवा संघटनेच्या निवेदनात आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी  काही नावं पोलिसांना दिली आहेत. त्यामुळे पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी करणार का ? असे एक ना अनेक प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची उकल महाराजांच्या हयातीतच होणं गरजेचं बनलं आहे. दरम्यान काल रात्री राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांना नांदेडच्या खासगी रुग्णलयात दाखल करण्यात आलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.