मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. मुंबई येथील आझाद मैदानात संभाजीराजे आमरण उपोषणाला सुरूवात करत त्यांनी आर या पारची भूमिका घेतलीय. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यत मैदान सॊडणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय.
संभाजीराजे यांच्या भेटीसाठी अनेक नेते आझाद मैदानात येत आहेत. आज शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी संभाजीराजे यांची आझाद मैदानात भेट घेतली. यावेळी मराठा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक होत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
खासदार अनिल देसाई यांनी याभेटीदरम्यान आम्ही सर्व आपल्यासोबत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपल्या मागण्या मांडतो. आपल्या भावना लवकरात लवकर पोहोचवतो. मराठा समाजाला लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमचीही भूमिका आहे, असे सांगितले.
मात्र, यावेळीही मराठा मोर्चाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते. हे पाहून खासदार संभाजी राजे यांनी उद्धव ठाकरे माझे मित्र आहे. देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहे. समाजाचे आरक्षण काढल्यापासून काहीच राहिले नाही. हा दीर्घकाळ लढा आहे, असे सांगितले.
तर घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याना माझ्यासमोर असा उद्रेक होणे बरोबर नाही. तुमचा राजा जिवंत पाहिजे असेल तर हे योग्य नाही, अशा शब्दात सुनावले.
दरम्यान, संभाजीराजे यांच्या तपासणीसाठी जेजे रुग्णालयातून ४ डॉक्टरांचे एक पथक दाखल झालं. त्यांनी संभाजीराजेंचे रक्तदाब आणि ब्लड सॅम्पल्स घेतले. या वैद्यकीय तपासणीत संभाजीराजे यांचे ब्लड प्रेशर आणि शुगर नॉर्मल असल्याचे आढळून आल्याची माहिती जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलीय.