पोलीस होण्याचं स्वप्न घेऊन घराबाहेर पडला अन्... तरुणाच्या मृत्यूने लातूर हादरलं

Police Bharti : राज्यात अनेक ठिकाणी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु असून अनेक तरुणी त्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. सूरजही पोलिसांत भरती होण्याचे स्वप्न बाळगून तयारी करत होता. मात्र त्याचे हे स्वप्न अधुरेच राहिले

Updated: Feb 12, 2023, 02:56 PM IST
पोलीस होण्याचं स्वप्न घेऊन घराबाहेर पडला अन्... तरुणाच्या मृत्यूने लातूर हादरलं title=

Police Bharti : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात पोलीस भरतीची (Police Bharti) चर्चा सुरु आहे. राज्यभरातील तरुण पोलीस भरतीसाठी जीवतोड मेहनत करताना दिसत आहेत. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उच्च शिक्षितांपासून पदवीधर असलेले तरुणही या पोलीस भरतीमध्ये सहभागी झाले आहेत. अनेक ठिकाणी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु असून काही ठिकाणी त्याची तयारी सुरु आहे. मात्र पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाचा भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. लातूर - औसा राष्ट्रीय महामार्गावर बुधोडा गावाजवळील आलमला मोड येथे हा सर्व धक्कादायक प्रकार घडलाय. सूरज अशोक कांबळे असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. सूरजसोबत आणखी एकाला भरधाव वाहनाने धडक दिली. त्यामुळे आणखी एक जखमी झाला आहे.

सूरज कांबळे हा रोज पहाटे उठून पोलीस भरतीसाठी सराव करत होता. रविवारीसुद्धा पहाटे उठून सूरज आणि त्याचा एक मित्र नेहमीप्रमाणे सरावासाठी घराबाहेर पडला. मात्र पहाटे पाचच्या सुमारास त्याला एका भरधाव वाहनाने चिरडले. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर सूरजचा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दुसरीकडे, परळी-अंबाजोगाई रस्त्यावर ट्रॅक्टर आणि मोटरसायकलच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर असून उपचारासाठी स्वराती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे तिघेही मजूर असून दिवसभरातील काम आटपून घरी निघाले होते. दरम्यान याचवेळी उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची त्यांच्या बाईकला धडक बसली. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. व्यंकटेश कांदे, रोहित भराडीया आणि अशोक धोकटे असं या तिघांचे नावे आहेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x