सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड : स्वप्न पाहाणं महत्त्वाचं आहे. तर ती साकार करण्यासाठी रात्रीचा दिवस केला जातो. नांदेडच्या व्यक्तीनं एक भन्नाट स्वप्न पाहिलं. MSEB मध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने भन्नाट सायकल तयार केली आहे. ही सायकल एकदा चार्ज केली की तब्बल 250 किमीपर्यंत धावते.
या कर्मचाऱ्याने बॅटरीवर चालणारी सायकल तयार केली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही सायकल तब्बल 250 किलोमिटर धावते. नांदेडमधील रहिवाशी बालाजी कोंढेकर यांनी ही सायकल तयार केली आहे. कोंढेकर हे एमएसइबीमध्ये कर्मचारी असून काही दिवसांवर त्यांची निवृत्ती आहे.
निवृत्तीनंतर आपला दररोजच्या प्रवासावरील खर्च कमी व्हावा यासाठी कोंढेकर यांनी बॅटरीवर जास्त चालनारी सायकल बनवण्याचे ठरवले. सायकल, मोटर आणि बॅटरीच्या साहाय्याने त्यांनी सायकल तयार केली. ही सायकल तयार करण्यासाठी लिथीयम बॅटरीचा वापर करण्यात आला आहे.
36 व्होल्ट 30 एम्पियरची ही बॅटरी आहे. सायकलला लाईटसह दुचाकीतील इतर सुविधा आहेत. ही सायकल कमी वजनाची असल्याने ती बॅटरी वर जास्त किलोमिटर धावू शकते. सुरुवातीला कोंढेकर यांनी एक बॅटरी वापरली. त्यात सायकल 120 किमिपेक्षा जास्त धावते.
जास्त अंतर एकदाच कापायचे असल्यास चार्जिंगची मर्यादा येते. तेव्हा कोंढेकर यांनी आणखी एक बॅटरी वाढवली. 2 बॅटरीवर सायकल तब्बल 250 कीमिपेक्षा जास्त धावते. यासाठी त्यांना जवळपास 70 हजार रुपये खर्च आला.
एका बॅटरी वर 120 किमी धावण्यासाठी निम्माच खर्च लागतो. आपल्या देशाचे फार मोठे चलन पेट्रोल वर खर्च होते. आपल्या देशात बननारी वीज वापरून तो तोटा कमी व्हावा अशी आपली अपेक्षा असल्याचे कोंढेकर म्हणाले.
कोंढेकर यांनी बनवलेल्या सायकलचे अनेक फायदे आहेत. पर्यावरण रक्षणापासून ते पेट्रोल वर होणारा देशाचा खर्च वाचू शकणार आहे. त्यामुळे अश्या देशी संशोधनाना सरकारने पुढाकार घेऊन वाव देण्याची गरज आहे.