श्रीकांत राऊत, झी २४ तास, यवतमाळ : यवतमाळमध्ये खोल विहिरीतील पाण्यात पडलेल्या गायीची सुटका करण्यात आलीय. सोशल मीडियावर या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल होतोय. चाऱ्यासाठी भटकत असताना ही गाय गावातील विहिरीत कोसळली. नातूवाडीतील युवकांनी सामूहिक प्रयत्नातून दोरखंडाच्या साहाय्याने ३० फूट खोल विहिरीतून गायीला कुठलीही ईजा होऊ न देता सुखरूप बाहेर काढले.
राज्यात एकीकडे बैलाला जेसीबीने क्रूरपणे चिरडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होत असतानाच यवतमाळमध्ये मात्र खोल विहिरीतील पाण्यात पडलेल्या गायीला संवेदनशील युवकांनी शर्थीचे प्रयत्न करून जीवदान दिलं. हा व्हिडिओदेखील समाज माध्यमांमध्ये व्हायरल होतोय तसंच या तरुणांचंही सर्वस्तरांतून कौतुक होतंय.
यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील नातुवाडी येथील ग्रामस्थांनी या मोकाट गायीचे प्राण वाचवले. चाऱ्यासाठी भटकत असताना ही गाय गावातील विहिरीत कोसळली होती. खोल विहिरीतील पाण्यात पडताच गायीने हंबरडा फोडला. विहिरीत गाय पडल्याचे समजताच नातूवाडीतील युवकांनी सामूहिक प्रयत्नातून दोरखंडाच्या साहाय्याने ३० फूट खोल विहिरीतून गायीला कुठलीही ईजा होऊ न देता सुखरूप बाहेर काढले. तब्बल दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर गायीचे प्राण वाचविण्यात यश आल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.