चेतन कोळस, येवला, झी २४ तास - डाळिंब, द्राक्षाच्या बागांवर फवारणीसाठी चांदवडच्या मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी एक अनोखा रोबोट तयार केलाय.या रोबोटच्या मदतीने शेतकऱ्यांना बांधावर उभं राहून डाळिंब तसेच द्राक्षबागांवर फवारणी करता येणार आहे.
शेतकऱ्याला लागणारा ट्रॅक्टरचा खर्च या रोबोटमुळे वाचणार असून या रोबोच्या साहाय्याने शेतातील गवत तसेच भाजीपाला देखील कापता येणार आहे.
चांदवडच्या एस. एन. जे. बी. इंजिनीअरिंग कॉलेजच्या मेकॅनिकलच्या फायनल इयरच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांचा दृष्टिकोनातून पिकावर फवारणी करण्यासाठी रोबोट तयार केला आहे.
डाळिंब, द्राक्ष बागेसाठी फवारणीसाठी ज्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतकऱ्याला फवारणी करण्यासाठी 1 एकर शेतासाठी एक ते दीड हजार रुपये खर्च येतो. हीच बाब लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांनी बॅटरीवर चालणारा रोबोट तयार केला आहे.
रोबोटच्या मदतीने शेतकऱ्याला बांधावर उभे राहून रिमोटच्या मदतीतून रोबोट हाताळता येणार आहे. यासोबतच पिकावर फवारणी करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा पेट्रोल-डिझेलचा खर्च यामुळे वाचणार असून शेतकऱ्याला लागणारे कष्ट देखील कमी लागणार आहे.
या रोबोटची बॅटरी चार्ज केल्यानंतर जवळपास एक तास हा रोबोट फवारणी करू शकतो. तसेच या रोबटचा लोड वाहून नेण्यासाठी देखील उपयोग होऊ शकतो. या रोबोच्या मदतीने गवत, भाजी देखील कापता येणार आहे.
हा रोबोट तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन महिन्याचा कालावधी लागला असून 30 ते 35 हजार रुपये लागला आहे. नक्कीच ह्या रोबोचा वापर शेतकऱ्यांनी केल्यास शेतकऱ्यांचा खर्च आणि कष्ट वाचण्यास मदत होऊ शकते असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.
yeola students made jugadu robo for sprinkling fertilizers on grapse farms