नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात जाताय? काय करावं आणि काय करू नये... पोलिसांचा इशारा पाहूनच घ्या

New Year 2025 Lonavla : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात येणाऱ्यांना पोलिसांकडून महत्त्वाचा इशारा. यावेळी एक लहानशी चूकही पडेल महागात. 

Updated: Dec 30, 2024, 09:51 AM IST
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात जाताय? काय करावं आणि काय करू नये... पोलिसांचा इशारा पाहूनच घ्या title=
year end 2024 maharashtra pune lonavla police force in active mode to maintain law and order know what to do and what not to do

चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ : (Year End 2024) सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी म्हणून अनेक मंडळींनी अनेक बेत आखले आहे. या अनेक बेतांमध्ये बऱ्याचजणांसाठी एक ठिकाण कायम आहे, ते म्हणजे लोणावळा. नवीन वर्षाच निमित्त साधून लोणावळ्यात पर्यटक दाखल झालेत. लोणावळ्यातील लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट या ठिकाणी नवीन वर्ष साजरा करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पर्यटक आले आहेत. 

नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक हे लोणावळ्यातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. राज्यभरातून आलेल्या या पर्यटकांना लोणावळ्यातील आल्हाददायक वातावरणाची भुरळ पडली आहे. 

मुळात दरवर्षी येथे पर्यटक हजारोंच्या संख्येने येत असतात. यंदाच्या वर्षी देखील नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोणावळा येथे पर्यटकांची गर्दी झाली आहे. तर येथील हॉटेल हाऊसफुल्ल झाले आहेत. पर्यटकांच्या गर्दीमुळं लोणावळ्यातील व्यवसाय तेजीत सुरू असून, पोलीस प्रशासनही सज्ज झालं आहे. शिवाय या दिवसांत पर्यटकांना वाहतुकीचा कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता लोणावळा पोलीस प्रशासनाकडून घेतली जात आहे. नाताळाचा सण साजरा करण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी संपूर्ण लोणावळा नगरी सजली आहे.

तळीरामांवर पोलीस प्रशासनाची नजर 

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन नगरी लोणावळा-खंडाळ्यासह मावळातील पर्यटनस्थळे सजली असून, सार्वजनिक ठिकाणी धांगडधिंगा, हुल्लडबाजी, गैरवर्तन, मद्य प्राशन करून वाहने चालविणाऱ्या तळीरामांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिला आहे. 

हेसुद्धा वाचा : देशात थंडीची लाट आणखी तीव्र होणार; महाराष्ट्रात पाऊस... IMD चा स्पष्ट इशारा 

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण पोलीस सज्ज झाले असून, यासाठी अतिरिक्त पोलीस फौजफाटा मागविण्यात आला आहे. सार्वजनिक व पर्यटनस्थळी हुल्लडबाजी, धांगडधिंगा करणे, मद्य प्राशन करून वाहने चालविणे, महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे एक गस्त पथक तैनात करण्यात आले आहे. तर लोणावळ्यात तसेच पवनानगर भागात साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात आले आहे. त्यामुळं सुट्टीचा आनंद घेताना भान विसरून चालणार नाही ही बाब लक्षात ठेवण्याचं आवाहन पर्यटकांना करण्यात येत आहे.