Maharashtra Weather News : केंद्रीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडी (IMD) च्या माहितीनुसार देशभरात यंदाच्या जानेवारी महिन्यात तुलनेनं तापमान अधिक असेल. पूर्व, उत्तर पश्चिम, पश्चिम मध्य क्षेत्र वगळता उर्वरित भागांमध्ये तापमान सामान्यहून अधिक असेल. राहिला प्रश्न पर्जन्यमानाचा, तर देशात जानेवारी महिन्यातील पावसाचं प्रमाणही तुलनेनं कमीच असेल.
महाराष्ट्रात डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यामध्ये हवामानात झालेल्या सातत्यपूर्ण बदलांमुळं थंडीचा कडाका कमी झाला असून, सध्याच्या घडीला बहुतांश भागांमध्ये पहाटे धुकं, दुपारच्या वेळी सूर्याचा दाह आणि सायंकाळच्या वेळी तापमानातील घट पाहता गारठा जाणवत आहे. दिवसभरात साधारण तीन वेगळ्या स्थितींमधील या हवामानामुळं राज्यात सध्या आजारपणाचं सावटही पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्यातील तापमानाच चढ-उतार अपेक्षित असून, मध्य महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टी क्षेत्रावर याचा परिणाम दिसून येणार आहे. उत्तर भारतातील मैदानी क्षेत्रांध्ये तापमानाच वाढ झाल्यानं इथं थंडीचा कडाका कमी झाला आहे. ज्यामुळं इथून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळं महाराष्ट्रातील तापमानवाढ पाहायला मिळाली.
दरम्यान, येत्या दोन दिवसांच तापमान अचानक कमी होऊन त्यात क्वचित वाढ झाल्यास आश्चर्य वाटू नये. असं असलं तरीही कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा मात्र राज्यात कायम असेल असाही इशारा हवामान विभागानं देत येत्या काही दिवसांत किमान तापमानाचा पारा 15 अंशांहून खाली येण्याचाही अंदाज वर्तवला आहे. कोकण किनारपट्टी भागामध्ये हवेत आर्द्रतेचं प्रमाण अधिक असल्यानं उष्मा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्रामध्ये अल्हाददायक गारठा पडण्याचा अंदाज आहे. विदर्भातील थंडीवर या प्रणालीचा फारसा परिणाम होणार नसून, इथं तापमान स्थिर राहील. तर, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मात्र किमान तापमानात वाढ नोंदवली जाईल असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
हवामानाचे तालरंग का बदलले?
2001 नंतर 2024 मध्ये सर्वाधित पर्जन्यमान असणाऱ्या डिसेंबर महिन्यामुळं हवामानात हा बदल झाल्याचं स्पष्ट होत आहे. देशभरात यंदा पावसानं 73 टक्के अधिक प्रमाणात हजेरी लावली. त्यातच उत्तरेकडील राज्यांमध्येही पावसानं हजेरी लावली. दरम्यानच्या काळात एकूण सात पश्चिमी झंझावातांनी देशातील हवामानावर मोठा परिणाम केला, ज्यामुळं सातत्यानं हे बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.