Lonavla: लोणावळ्यातील एकवीरा गडावर नववर्षानिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमते. एकवीरा देवीचे स्थान असलेल्या कार्ला गडावर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भाविकांनी गर्दी केली होती. मात्र, काही हुल्लडबाज भाविकांमुळं इतर नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. कलरफुल फटाके फोडल्याने एकविरा देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला.
लोणावळ्यातील एकवीरा गडावर आज हुल्लडबाज भाविकांनी मंदिराजवळ कलर धुराचे फटाके फोडल्यामुळं मधमाश्यांच्या पोळाला इजा पोहचवली. त्यानंतर मधमाश्यांनी भविकांवर हल्ला करत चावा घेतला. यात अनेक भाविकांची पळापळ झाली तर बहुतेक भाविकांना मधमाशांनी चावा घेऊन जखमी केले आहे. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
मुंबईच्या कुलाबा येथून देवीची पालखी आली होती. त्या पालखीतल्या काही भक्तांनी फटाके वाजविले त्याचा फटका बाकीच्या भक्तांना ही बसला आहे. मात्र गडावर फटाके वाजविण्यावर बंदी असतानाही काही भाविक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे. एकवीरा गडावर फटाका बंदी कायम असावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Video: कलरफुल फटाके फोडल्याने एकविरा देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला#Ekveeraaaitemple #video #maval #zee24taas pic.twitter.com/RDtwz4S2hg
— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 2, 2025
जखमी भाविकांना तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. जखमींवर तातडीने उपचार करुन काहींना सोडून देण्यात आलं आहे. तर, ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना काही काळ निरिक्षणाखाली ठेवून मग डिस्चार्च देण्यात येणार आहे.
प्रचंड धुरामुळे मधमाश्यांनी मोठा हल्ला
जत्रेवेळी पूजा करताना झालेल्या प्रचंड धुरामुळे मधमाश्यांनी मोठा हल्ला केल्याची अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा चेंगराचेंगरीची घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळं अशा संवेदनशील ठिकाणी जाताना भाविकांनी काळजी घ्यावी, असं अवाहन करण्यात येत आहे.