श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : यवतमाळ दुहेरी हत्याकांडाने (Double Murder) हादरलं. जिल्ह्यातील पुसदच्या (Pusad) ईटावा वार्डात मित्रांनीच काका आणि पुतण्याचा धारदार शस्त्रांनी हल्ला करुन हत्या (Murder) केली. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. दुहेरी हत्याकांडाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्षुल्लक कारणावरुन मित्रांनी मित्र आणि त्याच्या काकावर जीवघेणा हल्ला केला. हत्येच्या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण पसरलं होतं. या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
राहुल हरिदास केवटे (45), क्रीश विलास केवटे (20) अशी मृतांची नावं असून दोघंही इटावा वार्डात राहातात. तर बंटी हरिदास केवटे हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. रात्री एक वाजताच्या सुमारास गणेश तोडकर आणि त्याच्या 5 ते 6 सहकाऱ्यांनी धारदार शस्त्रांनी या तिघांवर हल्ला केला. मृताचा पुतण्या नयन केवटे ह्याने पुसद पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाकळ केली. केवटे परिवार हे सहा कुटुंबांमध्ये ईटावा वार्डात वेगवेगळे राहतात. आरोपी गणेश तोरकडे हा रात्री साडे दहा वाजता त्या ठिकाणी आला.
यावेळी नयन केवटे आणि गणेश तोरकडेमध्ये क्षुल्लक गोष्टीवरुन वाद झाला. गणेश हा आपल्या गोष्टी बाहेरच्या लोकांना सांगतो, चुगल्या करतो असं म्हणत नयने गणेशला हटकलं. यावर संतापलेल्या गणेशने मित्र अवि चव्हाणला बोलावून नयनला शिवीगाळ केली. यावरुन त्यांच्यात वादावादी झाली. यावेळी नयनचे काका बंटी केवडे यांनी मध्यस्थी करत भांडण सोडवलं आणि त्यांना आपापल्या घरी जाण्यास सांगितलं. पण जाताना गणेश आणि अवि या दोघांनी त्यांना बघून घेऊ असं धमकावलं. प्रकरण मिटल्यानंतर रात्री घराजवळ राहुल केवटे, बंटी केवटे आणि क्रिश केवटे हे तिघं गप्पा मारत उभे होते.
त्यावेळी गणेश तोरकडे आणि त्याचे पाच ते सहा मित्र हातात कायते, चाकू अशी हत्यारं घेऊन त्या तिघांवर हल्ला केला. आरडाओरडा ऐकून बंटी केवटे बाहेर आला त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्याही पाठित कोयता खुपसला. तर हल्लेखोरांच्या तावडीतून पळून जाणाऱ्या क्रिशला खाली पाडून त्याच्या कोयता आणि चाकूने वार केले. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर तिथून पळून गेले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारदरम्यान राहुल केवटे आणि क्रिश केवट या दोघांचा मृत्यू झाला. तर बंटी केवटे हा गंभीर जखमी झाला आहे.
याप्रकरणी नयन केवटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी पवन वाळके, निलेश थोरात, गणेश तोडकर, गणेश कापसे, गोपाल कापसे आणि अवि चव्हाण यांच्या विरोधात खूनाचा आणि ऍट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.