राजराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : जगातील तिसरी लेझर गुरुत्वीय लहरी वेधशाळा (Laser Gravitational Wave Observatory) औंढा-नागनाथ (Aundha-Nagnath) इथं उभारली जाणार आहे. औंढा (नागनाथ) तालुक्यातील लायगो (LIGO)प्रकल्पासाठी केंद्र सरकारने यापूर्वीच 300 एकर जमीन संपादित केली आहे. यासाठी लागणारी सर्व शासकीय कार्यवाही पूर्ण झाली. पण अनेकवेळा या भागाची पाहणी-सर्व्हे करण्यात आले असातना मध्येच हा प्रकल्प इथून इतरत्र हलविण्याचे प्रयत्न सुरु झाले.
हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील (MP Hemant Patil) यांनी मात्र हा प्रकल्प इतर कुठेही हलवू नये यासाठी केंद्रीय अंतराळ आणि अणुऊर्जा विभागाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांच्यासह पृथ्वीविज्ञान विभागाचे सचिव (Department of Earth science) डॉ. एम. रविचंद्रन यांची भेट घेऊन तात्काळ हा प्रकल्प मार्गी लावावा या संदर्भात बैठक बोलवावी अशी मागणी केली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट देखील त्यांनी घेतली होती.
औंढा नागनाथ तालुक्यातील दुघाळा परिसरात लेसर इन स्फेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी (LIGO) हा प्रकल्प उभारण्याकरीता वन विभागाकडुन 121 हेक्टर जमीन हस्तांतरणास केंद्राच्या वन व पर्यावरण विभागाने हिरवा झेंडा दाखवला आहे. या प्रकल्पासाठी जमीन हस्तांतर प्रक्रिया पूर्ण झाल्याने प्रकल्पाच्या उभारणीतील अडथळा दूर झाला आहे. या प्रकल्पाला 17 फेब्रुवारी 2016 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने लायगो इंडिया प्रकल्पास तत्वतः मंजुरी दिली आहे.
भारतासाठी अतिशय प्रतिष्ठेची ठरणारी, ब्रम्हांडाचा धांडोळा घेणारी आणि भारतात खगोलशास्त्राला चालना देणारी जगातील तिसरी लेझर गुरुत्वीय लहरी वेधशाळा 2600 कोटी रुपये खर्चून महाराष्ट्रातल्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथं स्थापन करण्यात येणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
अवकाशातील तारे, कृष्णविवर न्यूट्रॉन्ससह ब्रह्मांडातील बारकावे जाणून घेणाऱ्या लेझर इंटरफेरोमीटर गैन्डिटेशनल वेल्ट वेधशाळा जगात दोनच असून त्या दोन्ही अमेरिकेत आहेत. अशाप्रकारची तिसरी वेधशाळा भारतात स्थापन करण्याचा प्रस्ताव अमेरिकेनेच मान्य केला होता. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने त्यांच्या उपस्थितीत 30 मार्च 2016 रोजी अमेरिकेसोबत एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून, वेधशाळेच्या स्थापनेमुळे भारताच्या अंतराळ तंत्रज्ञान क्षमतेला मोठेच बळ मिळणार असून भारताची जागतिक स्तरावरील भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली आहे. देशातील महत्वपूर्ण प्रकल्प म्हणून या प्रकल्पाची निवड केल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाटील यांनी आभार मानले आहेत.