Mumbai Local Woman Molested: मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) महिलेवर अत्याचार झाल्याच्या घटनेला महिना उलटत नाही तर पुन्हा एक धक्कादायक घटना समोर येत आहे. हार्बर मार्गावरील (Harbour Train) प्रवासात तरुणीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई ही मायानगरी म्हणून ओळखली जाते तर मुंबईची लोकल ही लाइफलाइन म्हणून मात्र गेल्या महिन्याभरात घडलेल्या घटनांवरुन आता मुंबईतही महिला सुरक्षित नसल्याचे चित्र समोर येत आहे. (Mumbai Local Woman Molested News)
मंगळवारी नेरुळ येथून रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास पनवेलला निघालेल्या लोकलमध्ये महिलेचा विनयभंग झाल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित महिलेनेच याप्रकरणी तक्रार नोंदवली होती. महिलेच्या तक्रारीनुसार रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. निषाद धारीया असं या आरोपीचे नाव आहे. 20 जून रोजी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
नेरूळ-पनवेल लोकलच्या पनवेल दिशेकडील दिव्यांग डब्यामागे असलेल्या जनरल डब्यातून महिला प्रवास करत होती. त्यावेळी तिच्यासोबत तिचा होणारा पतीदेखील होता. आरोपी निषाद धारिया याने तरुणीला धक्का देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष करुन ती त्याच्यापासून लांब सावरुन उभी राहिली. मात्र, बेलापूर ते खारघरपर्यंत वारंवार तो शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न करत होता.
अखेर त्याचा त्रास असह्य होऊन सदर तरुणीने पनवेल रेल्वे पोलिस गाठत याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ याबाबत कठोर पावलं उचलत धारियाला अटक केली आहे. या घटनेने पुन्हा एका महिला प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई लोकलमध्ये एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. 40 वर्षांच्या आरोपीने धावत्या ट्रेनमध्येच पीडितेवर अत्याचार केल्याच्या घटनेने मुंबई हादरली होती. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मस्जिद स्थानकांदरम्यान सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी हा प्रकार घडला होता. मस्जिद स्थानकात ट्रेन आल्यानंतर तरुणीने आरडा-ओरडा केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.
दरम्यान, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सदर आरोपीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सीएसएमटी स्थानकावर तो काही महिलांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना दिसत आहे. आरोपीचे नाव नवाजू करीम शेख असं असून सीसीटीव्हीत संपूर्ण प्रकार कैद झाला आहे. घटनेच्या दिवशी त्याने स्थानकावर एकूण 5 महिलांची छेड काढल्याचे समोर आले होते.