पुणेः पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पुण्यात घडलेल्या दोन घटनांमध्ये तरुण आरोपींचा समावेश असल्याचं समोर आले आहे. पुण्यात चक्क अंडा हाफ फ्रायवरून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. अंडा भुर्जीची गाडी चालवणाऱ्या विक्रेत्यावर गिऱ्हाईकाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील चंदन नगर भागात अजब घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 20 वर्षांच्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
अंडा भुर्जी विक्रेते जयवंत भोसले यांनी याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार अमित कोठांबे (२०) या तरुणाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार खराडी येथील झेंसर आयटी पार्कजवळ बुधवारी रात्री १२.१५ वाजता घडला आहे. जयवंत भोसले यांची अंडा भुर्जीचा घरगुती व्यवसाय असून त्यांची या ठिकाणी हातगाडी आहे. या दोघांची ही आधीपासून तोंडओळख आहे.
बुधवारी रात्री आरोपी अमित हा जयवंत यांच्या हातगाडीवर आला. अमितने जयवंत ला "अंडा हाफ फ्राय" ची ऑर्डर दिली. तेव्हा जयवंत यांनी सुरुवातीलाच अमितकडे पैसे मागितली. अमितला या गोष्टीचा राग आला आणि त्यांच्यात वाद सुरू झाले.
वाद इतके विकोपाला गेले की त्यानंतर संतापाच्या भरात अमितने जयवंत यांचे डोके हातगाडीच्या लोखंडी अँगलवर आपटले. यात जयवंतच्या नाक, कपाळावर गंभीर जखम झाली आहे. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पुण्यात घडलेल्या दुसऱ्या घटनेत कोयत्याची दहशत अजून कायम असल्याचे समोर आले आहे. कुत्र्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून तरुणांनी कोयत्याने हल्ला केल्याचे समोर आले आहे. ३ ते ४ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर हल्ला केल्याचे उघड झाले आहे. १ महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेऊन तरुणांनी हे कृत्य केलं असून पुण्यातील कात्रज भागातील ही घटना आहे. यश कदम (१७) याने भारती विद्यापीठ पोलिसांकडे केली तक्रार दाखल केली असून या प्रकरणी ओंकार दानवले, यश घोडके, राज जगताप, सुजल चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. फिर्यादी यश हा त्याच्या मित्रांसोबत कात्रज भागात मोबाईलवर गेम खेळत होता. यावेळी त्याचा ओळखीचा तरुण ओंकार हा त्याच्या साथीदारांना घेऊन यशकडे जाऊन त्याला शिवीगाळ केली. तसेच एक महिन्यांपूर्वी त्यांच्या दोघात कुत्र्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात ठेऊन ओंकारने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने यशच्या डोक्यात कोयत्याने वार केले. डोक्याच्या उजव्या बाजूला वार झाल्यामुळे यश तिथेच खाली पडला आणि आरोपींनी तिथून पळ काढला.