खराखुरा 'हम दिल दे चुके सनम'! 2 मुलांच्या आईचे 3 मुलांच्या वडिलांसोबत अफेअर; नवऱ्यानेच लावून दिलं लग्न

Bihar News : बिहारच्या नवादामध्ये घडलेल्या या प्रकाराची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील व्हायरल होत असून पोलिसांनी अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही

आकाश नेटके | Updated: Jul 7, 2023, 04:58 PM IST
खराखुरा 'हम दिल दे चुके सनम'! 2 मुलांच्या आईचे 3 मुलांच्या वडिलांसोबत अफेअर; नवऱ्यानेच लावून दिलं लग्न title=
(फोटो - freepik.com)

Crime News : प्रेम आंधळं असतं असं आपण नेहमीच म्हणत असतो. अशाच एका प्रेमकहाणीवर बॉलिवूडमध्ये (bollywood) प्रसिद्ध असा 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटही येऊन गेलाय. पण खऱ्या आयुष्यातही अशीच एक घटना बिहारमध्ये घडली आहे. बिहारमधील (Bihar News) नवादा जिल्ह्याच्या गावातील एका विवाहित महिलेचे शेजारच्या गावात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या प्रेमात पडली होती. एके दिवशी महिलेचा प्रियकर तिला भेटण्यासाठी गुपचूप तिच्या घरी पोहोचला. त्यानंतर घरच्यांनी दोघांनाही पकडले. त्यावेळी महिलेच्या पतीला हा संपूर्ण प्रकार कळताच त्याने लगेचच दोघांचे लग्न लावून दिले.

विवाहित महिलेचे शेजारच्या गावात राहणाऱ्या एका विवाहित व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते. महिलेचा प्रियकर तिला भेटण्यासाठी गुपचूप तिच्या घरी पोहोचला होता. मात्र दोघांना घरच्यांनी पकडल्यानंतर त्यांनी प्रियकराला बेदम मारहाण करून डांबून ठेवले. हा सगळा प्रकार महिलेच्या पतीला कळताच त्याने दोघांनाही मंदिरात नेले आणि जबरदस्तीने लग्न लावून दिले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान याप्रकरणी कोणतीही तक्रार आली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

बिहारच्या नवादा जिल्ह्यातील नरदीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात हा सगळा प्रकार घडला आहे. महिलेचा पती काही कामानिमित्त रात्री उशिरा बाहेर गेला असताना पत्नीचा प्रियकर त्याच्या घरी पोहोचला होता. पण घरात कोणीतरी आल्याचे कुटुंबियांना कळले. तेव्हा त्यांना प्रियकर सापडला. दोघांना एकत्र पाहताच कुटुंबियांना संताप अनावर झाला. त्यांनी दोघांनाही पकडून बेदम मारहाण केली. हा सगळा प्रकार महिलेच्या पतीला समजताच तो घरी परतला. त्यानंतर त्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराला मंदिरात नेऊन त्यांचे लग्न लावून दिले. आजूबाजूचे स्थानिक लोक महिला आणि तिच्या प्रियकराच्या लग्नाचे साक्षीदार झाले.

महिलेचा प्रियकर नवादा येथील नरदीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मपना गढिया गावचा रहिवासी आहे. तो विवाहित असून तीन मुलांचा बाप आहे. दुसरीकडे, महिला कहुआरा गावची रहिवासी आहे. तिलाही दोन मुले आहेत. ही बाब आमच्या निदर्शनास आली आहे. मात्र अद्यापपर्यंत एकही तक्रार आलेली नाही आणि एफआयआरही दाखल झालेला नाही. त्यामुळेच आता काही सांगता येणार नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

या सगळ्या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये सगळ्यांसमोर प्रियकराने विवाहित प्रेयसीच्या भांगेत सिंदूर भरला. या अनोख्या लग्नाची संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे. मात्र यावेळी महिला पूर्णवेळ रडत होती. कुटुंबातील महिला तिला जबरदस्तीने पकडून लग्न लावून देत होत्या. या घटनेनंतर गावकऱ्यांनी दोघांनाही गावातून हाकलून दिले. या संपूर्ण प्रकरणात ग्रामस्थ आणि महिलेचा पती काहीही बोलायला तयार नाही.