'या' क्षुल्लक कारणाने तरुणाची निर्घृण हत्या, कारण ऐकून आरोपीच्या मित्रानेच केलं त्याला पोलिसांच्या स्वाधीन

Nagpur Crime : नागपूरमध्ये जुन्या वादातून एका तरुणाने त्याच्या मित्राची निर्घृण हत्या केली आहे. या हत्येनंतर आरोपीने आत्मसमर्पण केलं आहे. पोलिसांनी आरोपी विरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 7, 2023, 04:41 PM IST
'या' क्षुल्लक कारणाने तरुणाची निर्घृण हत्या, कारण ऐकून आरोपीच्या मित्रानेच केलं त्याला पोलिसांच्या स्वाधीन title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून नागपुरमध्ये (Nagpur Crime) गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोलिसांच्या (Nagpur Crime) कित्येक प्रयत्नानंतरही गंभीर गुन्ह्यांच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशातच शुल्लक कारणावरुन नागपुरात एकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हत्येनंतर आरोपी त्याच्या मित्राकडे गेला होता. मात्र मित्रानेच त्याला पोलिसांच्या स्वाधिन केल्याने हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.

कानाखाली मारल्याचा क्षुल्लक कारणातून एकाची हत्या झाल्याची घटना नागपूरच्या यशोधरा नगर पोलिसांच्या हद्दीत घडलीय.भारत उके असे मृत तरुणाचं नाव असून त्याचाच वस्तीत राहणाऱ्या रुपेश उर्फ बंटी यशवंत गडकरी याने त्याची हत्या केली आहे. पोलिसांनी या हत्येप्रकरणी बंटी यशवंत गडकरी याला अटक केली आहे. जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नागपुरच्या यशोधरा नगर पोलीस स्टेशन हद्दीत पिवळी नदी परिसरात ही खुनाची घटना घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भरत उके हा धोबीघाटच्या पिवळी नदी परिसरात राहत होता. तो स्टाईल फिटिंगचे काम करायचा. तर आरोपी रुपेश हा मांडवा वस्तीमध्ये राहून हमालीचे काम करायचा. दोघेही एकमेकांना ओळखत होते आणि अनेकदा त्यांनी तिथल्याच एका भोजनालयात एकत्र जेवण देखील केले होते. बऱ्याच वेळा ते बाहेर बसून गप्पा देखील मारायचे.

पण 15 दिवसांपूर्वी त्यांच्यात काहीतरी वाद झाला होता. याच वादातून भारत उकेने बंटीच्या कानाखाली मारली होती. त्यावेळी त्यांच्यातील भांडण सोडवण्यात आलं होतं. पण बंटीच्या मनातील राग शांत झाला नव्हता. त्याला सूड घ्यायचा होता. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास भारत हा त्याच्या मित्रांसोबत भोजनालयच्या बाहेर बसून गप्पा मारत होता. त्याचवेळी बाईकवर आरोपी बंटी तिथे आला आणि त्याने भारतच्या पाठीमागून चाकूने अनेक वार केले आणि त्याला जखमी केले. भारताच्या मानेवर आणि गळ्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या. या हल्ल्यानंतर बंटीने तिथून पळ काढला होता.

भारतवर झालेल्या हल्ल्यानंतर मित्रांनी त्याच्या घरच्यांना याबाबत माहिती दिली. घरच्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत भारतला रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासकार्य सुरु केले होते. दुसरीकडे आरोपी बंटी हा मित्राकडे जाऊन लपला होता. मित्राला हा प्रकार कळताच त्याने बंटीला गिट्टीखदान पोलिसांच्या स्वाधिन केले. पोलिसांनी रुपेशविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.