'विखे घराण्याबद्दल पवारांच्या मनात इतका द्वेष का ?'

विखे घराण्याबद्दल पवारांच्या मनात इतका द्वेष का ? असा प्रश्न विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. 

Updated: Mar 14, 2019, 01:27 PM IST
'विखे घराण्याबद्दल पवारांच्या मनात इतका द्वेष का ?' title=

मुंबई : विखे घराण्याबद्दल पवारांच्या मनात इतका द्वेष का ? असा प्रश्न विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. शरद पवारांनी बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल केलेले वक्तव्य दुर्देवी होते, त्यातून आपल्याला दु:ख झाल्याचे राधाकृष्ण पाटील यांनी म्हटले आहे.  नगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदराच्या प्रचारास मी जाणार नाही असेही त्यांनी जाहीर केले आहे. कॉंग्रेस नेते तसेच विरोधी पक्षनेते राधा कृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहीती दिली. 

जे हयात नाही त्यांच्याविषयी बोलणे चुकीचे असल्याचे म्हणत त्यांनी पवारांना टोला लगावला. शरद पवारांच्या विधानामुळे मला दु:ख झाल्याचेही ते म्हणाले. राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे. त्यांना भाजपातर्फे नगरमधून खासदारकीही देण्यात येत आहे. सुजय यांच्या भाजपा प्रवेशानंतर वडील राधाकृष्ण यांच्या अडचणीत वाढ झाली होती. ते विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देणार असल्याचीही चर्चा होती. पण याबद्दल त्यांनी काहीही भाष्य केले नाही. 

राष्ट्रवादीने अहमदनगरची जागा आपल्या मुलासाठी सोडावी, असा आग्रह राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीकडे केला होता. पण राष्ट्रवादीने ही मागणी फेटाळली होती. त्यानंतर सुजय विखे यांनी भाजपचा रस्ता धरला. त्यावर प्रतिक्रिया नोंदवताना 'माझ्या घरातील मुलाचे हट्ट मी पुरवू शकतो. पण दुसऱ्याच्या घरातील मुलाचे हट्ट मी कसे पुरवू शकतो... त्यांचा हट्ट त्यांच्या वडिलांनी पुरवायला पाहिजे' असं शरद पवारांनी म्हटले होते. पवारांच्या या विधानाचा राधाकृष्ण पाटील यांनी समाचार घेतला.  

मुलासाठी संघर्ष उभा राहिले असे म्हणणे चुकीचे असल्याचे राधाकृष्ण यांनी म्हटले. नगरमधल्या निवडणुकीत 3 वेळा राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले होते. त्यामुळे तिथली जागा काँग्रेसने घेतल्यास फायदा होणार होता. दोन्ही जागा काँग्रेसकडे असत्या तर त्यात गैर नव्हतं. यावर पुष्कळ चर्चा झाली. समन्वय घडवून आणण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला. स्वाभीमान, वंचित आघाडी यांच्यासाठी कोणत्या जागा सोडायच्या अशी आमची चर्चा सुरूच होती. पण राष्ट्रवादी त्यांच्या भुमिकेवर ठाम होती आणि तोपर्यंत सुजय यांनीही निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्याचा प्रचार आपण करणार नसल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले आहे.