दादरमधील प्रसिद्ध साड्यांचं दुकान 'भरतक्षेत्र'वर ईडीने धाड का टाकली? 'ते' 113 कोटी ठरले कारणीभूत

सक्तवसुली संचालनालयाने बुधवारी दादरमधील साड्यांचं प्रसिद्ध दुकान 'भरतक्षेत्र'वर धाड टाकली. या कारवाईमागे 113 कोटींच्या फसवणुकीचं प्रकरण आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 7, 2023, 09:48 PM IST
दादरमधील प्रसिद्ध साड्यांचं दुकान 'भरतक्षेत्र'वर ईडीने धाड का टाकली? 'ते' 113 कोटी ठरले कारणीभूत title=

सक्तवसुली संचालनालयाने बुधवारी दादरमधील साड्यांचं प्रसिद्ध दुकान 'भरतक्षेत्र'वर धाड टाकली. साड्यांच्या खरेदीसाठी हे फार प्रसिद्ध दुकान असून लग्नापासून ते सणांपर्यंत दरवेळी येथे महिलांची गर्दी असते. मुंबईत तसंच आसपासच्या परिसरात राहणाऱ्यांना हे दुकान माहिती नसणं तसं कठीणच. दादर पूर्वेला तर अनेकांसाठी हा लँडमार्क आहे. त्यामुळेच जेव्हा ईडीने या दुकानावर धाड टाकली तेव्हा त्याची चर्चा रंगली होती. यावेळी ही कारवाई नेमकी कशासाठी करण्यात आली असा प्रश्न अनेकांना पडला होता. तर मग त्याबद्दल जाणून घ्या...

भरतक्षेत्रवर छापा का टाकला?

ईडीने बुधवारी व्यापारी मनसुख गाला, त्यांचे सनदी लोकपाल आणि इतरांच्या 5 ठिकाणांवर छापे टाकले. भरतक्षेत्र हे साड्यांचं दुकान मनसुख गाला यांच्याच मालकीचं आहे. त्यामुळे कारवाईदरम्यान ईडीने भरतक्षेत्र दुकानावर धाड टाकली होती. पण साडीच्या दुकानावर ईडीने धाड टाकल्याने एकच खळबळ उडाली होती.

पण नेमकी कारवाई कशासाठी?

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ऑगस्ट 2019 मध्ये एसबी डेव्हलपर कंपनीचे अरविंद जयंतीलाल शाह या विकासकाची फसवणूक केल्याप्रकरणी मनसुख गाला आणि त्यांच्या सनदी लेखपालाविरोधात गुन्हा दाखल केला होता. 113 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच्याच आधारे ईडीनेही गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. त्याच चौकशीचा भाग म्हणून पुरावे गोळा करण्याच्या हेतूने ईडीने हे छापे टाकले. 

यामुळेच भरतक्षेत्रवर छापा

भरतक्षेत्र दुकानावर ईडीने टाकलेल्या छाप्यामागे आर्थिक गैरव्यवहाराचे जुने प्रकरण कारणीभूत होते. ईडीला छाप्यात बेहिशेबी आर्थिक व्यवहाराची माहिती उपलब्ध झाली होती. हवाला तसंच बनावट खरेदी देयकांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न झाला होता.  पण साड्यांची विक्री करणाऱ्या दुकानांवर याआधीही ईडीकडून छापे टाकण्यात आले असल्याने हे तसं पहिलं प्रकरण नाही. 

आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यात काय आहे?

आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, तक्रारदार अरविंद जयंतीलाल शाह यांनी 2006 मध्ये परळ येथील 3 जुन्या इमारती विकसित करण्यासाठी एसबी डेव्हलपर्स या बांधकाम कंपनीची स्थापना केली होती. या अब्दुल्ला इमारत 1,2,3 एका ट्रस्टशी संबंधित होत्या. या ट्रस्टचे विश्वस्त मोहम्मद सलीम माचिसवाला यांनी 20 ऑक्टोबर 2005 मध्ये शाह यांनी पॉवर ऑफ अॅटर्नीद्वारे इमारतींचे मालकी हक्क दिले होते.