लातूर शहर मतदारसंघातून यंदा कोण मारणार बाजी?

लातूर शहर विधानसभेच्या निवडणुकीकडे यंदा सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Updated: Oct 18, 2019, 12:12 PM IST
लातूर शहर मतदारसंघातून यंदा कोण मारणार बाजी? title=

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर शहर विधानसभेच्या निवडणुकीकडे यंदा सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुख विधानसभेचं प्रतिनिधीत्व करत आहेत. तिसऱ्यांदा ते विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. सलग दोन वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या अमित देशमुखांना भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटींनी दुसऱ्यांदा आव्हान दिलं आहे. तर वंचित आघाडीच्या राजा मणियार यांचेही नवं आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. भाजप सरकारने उजनीचं पाणी मिळवू न दिल्यानं लातूरला पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. हाच कळीचा मुद्दा भाजपच्या पथ्यावर येईल असा दावा अमित देशमुखांनी केला आहे.

विलासराव देशमुखांच्या निधनानंतर लातूर जिल्हा पूर्णपणे भाजपमय झाला आहे. लातूर महानगरपालिका, जिल्हा परिषद सारख्या संस्थांवर भाजपचा कब्जा आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेतही लातूर शहरातून भाजपला मतदाधिक्य आहे. त्यामुळे विकासाच्या रणनीतीवर आपण वरचढ ठरू असा विश्वास लोहोटींना वाटतो आहे. तर काँग्रेस आणि भाजपने उजनीच्या पाण्यावरून फसविल्याचा आरोपही मणियार यांनी केला आहे.

लातूर शहर मतदारसंघात मुस्लीम, दलित, लिंगायत आणि त्याखालोखाल मराठा मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या हक्काचा मुस्लीम-दलित हा काँग्रेसकडेच राहतो की भाजप-वंचित आघाडी त्यात छेद करणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.