Pune Loksabha BJP Candidate : भाजपने नुकतंच 195 लोकसभेच्या जागेसाठी (Pune Loksabha seat) उमेदवार जाहीर केले आहे. पण यामध्ये एकाही मराराष्ट्रातील जागेवर उमेदवाराची घोषणा झाली नाही. अशाचच आता भाजप महाराष्ट्रात देखील फिल्डिंग लावली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपला विजयाची हॅटट्रिक करायची आहे. 2014 मध्ये अनिल शिरोळे आणि 2019 मध्ये गिरीश बापट यांना खासदार म्हणून निवडून देणारी पुणेकर जनता 2024 मध्ये कुणाला कारभारी करणार, याची उत्सूकता सगळ्यांनाच आहे. खुद्द भाजपमध्येच उदंड जाहले उमेदवार अशी स्थिती आहे. (Pune political News)
पुण्यातून कुणाला उमेदवारी?
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन असो वा रामकथेचा कार्यक्रम, माजी महापौर मुरलीधर मोहोळ मागील दोन अडीच वर्षांपासून इमेज बिल्डिंग करतायत. तर बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमाचं आयोजन आणि पुण्याच्या व्हिजन डॉक्युमेंट निर्मितीसाठी पुढाकार घेणारे माजी आमदार जगदीश मुळीक यांनाही खासदारकीचे वेध लागलेत. त्रिपुरा विधानसभेतील भाजपच्या विजयाचे शिल्पकार आणि गेल्या लोकसभा निवडणुकीत वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींच्या प्रचार अभियानाचे प्रमुख सुनील देवधर यांनी पुण्यात कार्यक्रम आणि उपक्रमांचा सपाटा लावलाय. त्यांनाही भाजपकडून उमेदवारी हवीय, असं स्पष्ट चित्र समोर आलंय.
माजी खासदार संजय काकडे आणि प्रसिद्ध उद्योजक शिवाजी मानकर देखील पक्षानं संधी दिल्यास लोकसभा लढण्यास इच्छुक असल्याचं पहायला मिळतंय. यापैकी प्रत्येकानंच उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपपुढे उमेदवार ब्राह्मण असावा की ब्राह्मणेतर असा तिढा निर्माण झालाय. ब्राह्मणेतर उमेदवार दिल्यास कसब्याची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे.
पुण्यात भाजपच विजयी होणार, याची खात्री असल्यानं इच्छुकांची संख्या वाढल्याचा दावा करण्यात येतोय. पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजप निरीक्षक कृपाशंकर सिंह यांनी आपला अहवाल पार्लमेंटरी बोर्डाकडं पाठवला आहे. जेव्हा महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी होईल, तेव्हाच पुण्याचा हा सस्पेन्स संपणार आहे. पुण्यामध्ये प्रामुख्याने भाजपच्या 5 इच्छुक उमेदवारांची नाव चर्चेत आहेत. त्यांचे काही प्लस पॉईंट आहेत तर काही मायनस पॉईंट... यापैकी उमेदवारीची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडते, याविषयी औत्सुक्य आहे.