Pune Rain Update : पुण्यात गुरूवारी पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्यामुळे पुण्यातील सिंहगड रोडवरील नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. पुणे जिल्ह्यात बचावकार्यासाठी NDRF च्या 3 टीम तैनात करण्यात आल्यायत. मुसळधार पाऊस आणि त्यामुळे नद्यांना येणारे पूर की नैसर्गिक आपत्ती असली तरी पुरामुळे नागरी भागात होणारं नुकसान ही मानवनिर्मित आपत्ती असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं. मागील 24 तासात पुण्यामध्ये (Pune Rain Update) उडालेला हाहाकार त्याचच उदाहरण आहे.
एकता नगर परिसरातील सोसायट्या, रस्ते, दुकानं पाण्याखाली गेलेत. नागरिकांच्या छातीपर्यंत याठिकाणी पाणी आहे. पुणे एकता नगरमध्ये बोटीद्वारे बचावकार्य सुरुय. तर पुण्यातल्या विठ्ठलवाडी परिसरातही पाणी साचल्यामुळे नागरिकांचं बोटीद्वारे बचावकार्य करण्यात आलंय. मध्यरात्री नागरिक झोपेत असताना पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडालीय.
मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरुय. पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे पुण्याच्या सिंहगड रोडवरच्या अनेक सोसायट्या पाण्याखाली गेल्या. मुसळधार पावसामुळे पुणेकरांचे हाल सुरू आहेत. महानगरपालिकेसमोरील काकासाहेब गाडगीळ पूलावरून पाणी वाहू लागलंय. या पुलावर एक कार अडकलीय. पाणी पुलावरून वाहू लागल्यानं पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय.
बावधन परिसरात एक शोरुम पाण्यात गेलंय. याठिकाणी सामानाचं प्रचंड नुकसान झाल्याचं दिसून येतंय. त्याप्रमाणे बावधनमध्ये सर्व्हिस रोडवरही पाणी आहे. पुरामुळे इंद्रायणीवरील सर्वच पूल पाण्याखाली गेलेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जोडणारा पूल 18 वर्षानंतर प्रथमच पाण्याखाली गेलाय. त्यामुळे आळंदीचा पिंपरी-चिंचवड आणि पुण्याशी संपर्क तुटलाय.
राजकारण बाजूला ठेवा, सामान्य माणसाला मदत करा'. मुलं, ज्येष्ठ नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय. खडकवासला धरणाच्या वरच्या भागात 8 इंचापेक्षा जास्त पाऊस पडल्यानं ही परिस्थीती निर्माण झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय. तर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वांनीच फिल्डवर उतरण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी केलंय.
पुण्यातील लवासामध्ये दरड कोसळली. या दुर्घटनेत 2 बंगले गाडले गेलेत. त्या बंगल्यांत 2 जण असल्याची माहिती समोर आलीय. NDRF पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी बचावकार्य सुरु केलं. प्रत्येक पावसात पुणेकरांना या अशा त्रासाला सामोरं जावं लागतंय. शहरातील नदी नाले ओढे यांच्यावर झालेलं अतिक्रमण याला जबाबदार असल्याचं अनेकदा समोर आलंय. मात्र प्रशासन याकडे गांभिर्याने पाहणार का? प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.
महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानंतर प्रशासनाला जाग येते. यावेळी असंच घडलं. खडकवासल्यातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी - अधिक होऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलं होतं. असं असताना महापालिका आणि महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग अक्षरशः सुस्त होता. त्यांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या दृष्टिकोनातून काहीच केलं नाही. पोलीस यंत्रणादेखील सज्ज नव्हती असं म्हणावं लागेल.
पुण्यामध्ये 24 तासात सुमारे दीडशे मिलिमीटर पाऊस पडला. लोणावळ्यात चारशे मिलीमीटरच्या आसपास तर तामिनी घाटात पाचशे मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला. मागील कित्येक वर्षात असा पाऊस पडला नव्हता. अपवादात्मक परिस्थितीत अपेक्षेपेक्षा जास्त किंवा हवामान अंदाजापेक्षा जास्त पाऊस पडतो. त्यामुळे अतिवृष्टीची शक्यता वर्तवल्यानंतर आवश्यक खबरदारी घेतली गेली पाहिजे. पुण्यात ती घेतली गेली नाही हे स्पष्ट होतं.
नदीला पूर आला की डोंगरावरून वाहत येणाऱ्या ओढया नाल्यांचं पाणी मागेच साचायला सुरुवात होते. त्यातच अनेक ठिकाणी ओढ्या नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह बदलण्यात आले आहेत. त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालं आहे. त्यातच पुण्यामध्ये ठीक ठिकाणी मेट्रो प्रकल्प तसेच उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणून पाण्याचा योग्य मार्गानं निचरा होत नाही. शासन प्रशासन आणि नागरिक सगळेच त्याला जबाबदार आहेत.