Ashok Chavan joined BJP : अजूनही वेळ गेलेली नाही, अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असं आवाहन नाना पटोले यांनी गांधी भवन येथे काँग्रेसच्या बैठकीनंतर केलं. अशोक चव्हाण यांच्या जाण्याने काँग्रेसला मोठा सेटबॅक बसलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 'काँग्रेस पक्षाने अशोक चव्हाण यांना नेहमीच मोठी संधी दिली. अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षात नेतृत्व करण्याची नेहमीच संधी मिळाली पण भाजपात त्यांना ती संधी मिळणार नाही, आता त्यांना मागील रांगेत बसावे लागेल', असं म्हणत नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांचं मन वळवण्याचा प्रयत्न देखील केला. त्याचबरोबर काही काळासाठी अशोक चव्हाण यांच्यासाठी काँग्रेसची दारं उघडी असतील, असे संकेत देखील दिले आहेत.
नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि नांदेड लोकसभेची जागाही काँग्रेस पक्षच जिंकेल, असा विश्वास नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. मात्र, काँग्रेसला खरंच नांदेडचा गड राखता येणार आहे का? असा सवाल विचारला जातोय. नाना पटोले यांच्यावर अशोक चव्हाणांना थांबवण्याची वेळ का येतीये? जाणून घेऊया...
नांदेडमध्ये पहायला गेलं तर अशोक चव्हाण इस इक्वल टू काँग्रेस असंच समीकरण आहे. भाजप सत्तेत येण्यापूर्वी संपूर्ण नांदेडमध्ये काँग्रेसचा बोलबाला होता. नांदेड जिल्ह्यात एकूण 9 विधानसभा मतदारसंघ... त्यातील आता 4 मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. तर 3 मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं. अशोक चव्हाण यांची ताकद फक्त विधानसभा नाही तर महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतमध्ये होती. आता अशोक चव्हाण यांच्या जाण्याने नांदेडमध्ये काँग्रेस भूईसपाट झाल्याचं चित्र दिसून येतंय. अशोक चव्हाण वगळे तर इतर कोणत्याही काँग्रेसी नेत्याची ताकद नांदेडमध्ये दिसून येत नाही. भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर असा एकमेव चेहरा अशोक चव्हाण यांच्यासमोर होता. मात्र, आता अशोकरावच भाजपवासी झाल्याने नांदेडमध्ये स्पर्धेला वाव राहिला नाही, असं म्हणता येईल. अशातच आगामी लोकसभा निवडणूकीत जर वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे यांना महाविकास आघाडीकडून तिकीट मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.
एकेकाळी संपूर्ण नऊच्या नऊ विधानसभा जागेवर काँग्रेसचं वरचस्व होतं. मात्र, त्यापैकी आता नांदेड दक्षिण, हदगाव आमि देगलुरू या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचं अस्तित्व टिकून आहे. तर चार जागेवर भाजपने आपला पाय रोवलाय. अशातच आता अशोक चव्हाण यांच्या निर्णयानंतर काँग्रेस गड कसा राखणार? असा सवाल विचारला जातोय. भाजपच्या सध्याच्या 4 जागा तसेच काँग्रेसच्या 3 असं मिळून 4+3 = 9 असं समीकरण तयार होतंय की काय? असा शक्यता देखील वर्तविली जात आहे. त्यामुळे आता अशोक चव्हाण यांच्यासारखा बडा नेता भाजपच्या हाती लागल्याने हिंगोलीसह मराठवाड्यात देखील भाजप जोरदार मुसंडी घेईल, असं देखील म्हणता येईल.
अशोक चव्हाणांची आत्तापर्यंतची कारकीर्द
अशोक चव्हाण तब्बल 38 वर्षं काँग्रेसमध्ये कार्यरत होते. अशोक चव्हाणांचे वडील शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर 8 डिसेंबर 2008 रोजी अशोक चव्हाण पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 2009 मध्ये त्यांच्याच नेतृत्वात काँग्रेसनं विधानसभा निवडणुका जिंकल्या. 7 नोव्हेंबर 2009 रोजी त्यांनी दुस-यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र 11 नोव्हेंबर 2010 रोजी आदर्श घोटाळ्यातील आरोपानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. विविध खात्यांचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी अनेक वर्षं सूत्रं सांभाळली. 1987 आणि 2014 मध्ये नांदेडमधून ते दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले होते.