ठाणे : आज फाल्गुन आमावस्येचे शेवटचे काही प्रहर उरलेत. नव्या वर्षाची नवी सकाळ अनेक नव्या कल्पना, योजना घेऊन येते. साडेतीन मूहुर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या या सणाच्या दिवशी आपल्याकडे खरेदीचीही परंपरा आहे.
मराठी नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच एक आनंदाची बातमी. अधिकमास असल्यानं नवं वर्ष १३ महिन्याचं असणार आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार १८ मार्च २०१८ पासून सुरू होणारं वर्ष ५ एप्रिल२०१९ पर्यंत आहे. अधिक ज्येष्ठ मास १६ मे पासून १३ जूनपर्यंत येत आहे. त्यामुळे वटपौर्णिमेपासूनचे सर्व सण सुमारे वीस दिवस उशीरा येत आहेत.
साडे तीन मूहूर्तांपैकी एक असणारा गुढीपाडव्याचा सण. हिंदू नविन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने खरेदी भरभराटीची मानली जाते. त्यामुळे सोनेखरेदीसाठी पाडव्या झुंबड उडते. त्यापार्श्वभूमीवर पाडव्याच्या पूर्वसंध्येला सोन्याचा २४ कॅरेट सोन्याचा भाव ३१०२० रूपये प्रति तोळा राहिला. येत्या वर्षात ३१ हजार आसपास सोने राहील असा अंदाज सराफ व्यक्त करत आहेत.
तिकडे शेअर बाजार आणि रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूकीला चांगला भाव मिळेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पाडव्याच्या मूहुर्तावर घर, गाडी, सोनं खरेदी करण्याची आपली जुनी परंपरा आहे. पाडव्याच्या मूहुर्तावर मुंबईतल्या सोन्याच्या बाजारात तीनशे ते चारशे कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे.
नव्या वर्षाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या वर्षा तीन अंगारकी चतुर्थी असणार आहेत. त्यामुळे हे येणारं वर्ष झी 24 तासाच्या सर्व प्रेक्षकांना भरभराटीचं जावो हीच शुभेच्छा.