आर्मी भरतीसाठी गेले आणि क्वारंटाईन झाले...

झी २४ तासच्या बातमीची गृहमंत्र्यांनी घेतली दखल, उपाययोजना करण्याच्या सूचना

Updated: Jan 14, 2022, 10:37 PM IST
आर्मी भरतीसाठी गेले आणि क्वारंटाईन झाले... title=

मुंबई : कोरोनामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवेश करायचा असल्यास दोन डोस घेतल्याचा पुरावा किंवा RTPCR टेस्ट करणं बंधनकारक आहे. मात्र, दोन डोस घेतलेले असतानाही कोरोना चाचणी न करता महाराष्ट्रातील साठ विद्यार्थ्यांना थेट सक्तीचं क्वारंटाईन करण्यात आलं आहे. हि घटना आसाम राज्यात घडली आहे. दरम्यान, झी २४ तासच्या या बातमीची दखल घेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुढील उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात.

कोल्हापूर आणि पुणे येथील ६० विद्यार्थी इलेव्हन आसाम रायफल बटालियनच्या परीक्षेसाठी आसामला गेले होते. ट्रेडमॅनपदाच्या ६ जागांसाठी १२ ते १८ जानेवारी दरम्यान ही परीक्षा होणार होती. या परीक्षेसाठी हे सर्व विद्यार्थी १ ते ७ जानेवारी दरम्यान आसामला पोहोचले.

आसाम येथे पोहोचल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी न करता त्यांना थेट QUARANTIN करण्यात आलं. दरम्यानच्या काळात कोरोनामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. मात्र, या विद्यार्थाना अजूनही QUARANTIN सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे.

आर्मी भरतीसाठी गेलेल्या या युवकांपैकी योगेश मोसमकर या तरुणाने पुण्याच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी रुपाली भोसले यांच्याशी संपर्क साधला. QUARANTIN सेंटरमध्ये कोणत्याही सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. वेळेवर जेवण दिलं जात नाही. कोरोनामुळे भरती परीक्षा रद्द झालेली असतानाही आसाम सरकार सोडायला तयार नाही. आपल्याला इथं डांबून ठेवल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला. 

आसाममधून महाराष्ट्रात येण्यासाठी आठवड्यातून एकच ट्रेन आहे. महाराष्ट्रात येणारी पुढील ट्रेन १६ तारखेला आहे. परीक्षेनंतर लगेच महाराष्ट्रात येता यावं यासाठी या विद्यार्थ्यांनी आधीच रेल्वे बुकींग केले आहे. मात्र, त्यांना अजूनही QUARANTIN करून ठेवण्यात आलं असल्यामुळे राज्य सरकारने आमची  येथून सुटका करावी अशी मागणी त्यांनी केली.

रुपाली भोसले यांनी या घटनेचे गांभार्य ओळखून पुढील हालचाली सुरु केल्या. झी २४ तासाने याचे वृत्त प्रसारीत केले. या वृत्ताची दखल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली. 

विद्यार्थ्यांना सुखरुप महाराष्ट्रात आणण्याच्या सूचना दिल्या आहेत - गृहमंत्री
यासंदर्भात आपल्याला माहिती मिळाली आहे. महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन सचिव असीम गुप्ता यांना मी सूचना दिल्या आहेत. आसाम सरकारशी बोलून या मुलांना सुखरुप महाराष्ट्रात आणण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तशीच काही वेळ आली तर राज्यसरकार त्यांची पर्यायी व्यवस्था करेल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.