पुणे : सीबीआयने येस बँक-डीएचएफएल घोटाळा प्रकरणात अविनाश भोसले यांना अटक केली आहे. याआधी सीबीआयने मुंबई आणि पुण्यात छापे टाकले होते. याप्रकरणी सीबीआयचा तपास सुरू होता. सीबीआयने शनिवारी अविनाश भोसले, शाहीद बलवा आणि विनोद गोएंका यांच्याशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर कारवाई केली होती. आज अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली आहे.
अविनाश भोसले हे पुण्यातील सुप्रसिद्ध व्यावसायिक आहेत. 'येस बँकेचे अध्यक्ष राणा कपूर यांनी दिवाण हौसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये 3700 कोटी रुपये कर्जरोख्यांच्या माध्यमातून गुंतवले. ज्यामध्ये डीएचएफएलकडून राणा कपूर यांना 600 कोटी रुपयांची दलाली मिळाल्याचे समोर आले होते. त्यानंतर डीएचएफएलनेही 3700 कोटी रुपये छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुप, अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड तसेच बलवा आणि गोएंका यांच्या कंपनीत वळती केली. यामुळेच छाब्रिया यांना या प्रकरणी अटक होताच सीबीआयने तात्काळ भोसले, बलवा व गोएंका या तिघांशी संबंधित ठिकाणी छापा टाकला.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील अविनाश भोसले यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी तसेच मुंबईतील काही ठिकाणी छापा टाकला होता. अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित या दोघांचीही चौकशी करण्यात आली होती.
अविनाश भोसले हे महाराष्ट्रातील मंत्री आणि कॉंग्रेस नेते विश्वजित कदम यांचे सासरे आहेत.