प्रफुल्ल पवार / अलिबाग : Weekend Lockdown : लॉकडाऊन म्हणजे काय असतो याचा अनुभव आज रायगडकर घेत आहेत .कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या विकेंड लॉकडाऊनला रायगडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळत आहे . जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट आहे. (Weekend Lockdown: Strictly closed in Raigad district)
शनिवार आणि रविवार या दोन दिवसांच्या लॉकडाऊनला पहिल्याच दिवशी जिल्हाभरात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानेही बंद आहेत. तर किराणा माल , भाजीमार्केट , हॉटेल्सनाही टाळे लागले आहे. वाहतुकीवरही परिणाम दिसून येत आहे.
महत्वाचे म्हणजे अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी असली तरी पेट्रोल पंप , मेडिकल आणि दुधाची दुकाने वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद आहेत. अगदी साधी टपरीदेखील उघडी नाही. राज्यात कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकाने कडक निर्बंध लावताना शनिवार आणि रविवारी कडक लॉकडावून घोषित केला . या दोन दिवसात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील असे जाहीर करण्यात आले.
राज्यात अनेक ठिकाणी लॉकडावूनला विरोध होत असताना रायगडकरांनी विकेंड लॉकडावून मात्र मनापासून स्वीकारलेला दिसत आहे. अलिबागच्या रस्त्यांवर चिटपाखरूदेखील दिसत नाही. नेहमीची वर्दळीची गजबजणारी ठिकाणे शांत शांत आहेत. हॉटेल्स , बार यांना पार्सल सेवा देण्यास मुभा असली तरी तीदेखील बंद असल्याचे पहायला मिळाले . अगदी किराणा मालाच्या दुकानांचेही शटर डावून असून भाजीमंडई , मासळीबाजारात शुकशुकाट आहे.
आजच्या लॉकडाउनमुळे प्रवासी आणि अन्य वाहतूक देखील कोलमडली आहे . अधून मधून जाणारे एखादे वाहन वगळता वाहतूकदेखील थांबलेली आहे . मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई गोवा महामार्गावर अगदी तुरळक वाहने पहायला मिळत आहेत . एसटीची सेवा सुरू ठेवण्यास परवानगी असली तरी प्रवाशांअभावी बसेस आगारातच उभ्या आहेत. तर लांब पल्ल्याच्या अन्य जिल्हयातून काल आलेल्या बसेस परत जाताना रस्त्यावर दिसत आहेत.
मुंबई ते मांडवा , भाऊचा धक्का ते रेवस ही जलवाहतूकदेखील ठप्प आहे . ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त असला तरी पोलिसांना फारसे काही काम उरलेले दिसत नाही . येणारया जाणारया वाहनचालकांची चौकशी करूनच त्यांना पुढे सोडले जात आहे. लॉकडावूनमुळे लोकांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले . तर अनेकांनी पोलीस कारवाईच्या भीतीमुळे घरातच राहणे पसंत केले . सरकारी कार्यालयाना सुटी असल्याने रस्त्यावर वर्दळ अजिबात नव्हती.