अतिउत्साही पर्यटकांमुळे निसर्गरम्य आंबोलीकडे पर्यटकांची पाठ

अतिउत्साही पर्यटकांमुळे निसर्गरम्य अशा आंबोलीची खास ओळख पुसली जात आहे. विकेंड डेस्टिनेशन म्हणून आंबोलीकडे पाहणारे पर्यटक तिथल्या परिस्थिमुळे आता पाठ फिरवू लागले आहेत. काय आहेत यामागची कारणं, जाणून घेऊयात...

Updated: Aug 5, 2017, 02:03 PM IST
अतिउत्साही पर्यटकांमुळे निसर्गरम्य आंबोलीकडे पर्यटकांची पाठ title=

विकास गावकर, झी मीडिया, सिंधूदुर्ग : अतिउत्साही पर्यटकांमुळे निसर्गरम्य अशा आंबोलीची खास ओळख पुसली जात आहे. विकेंड डेस्टिनेशन म्हणून आंबोलीकडे पाहणारे पर्यटक तिथल्या परिस्थिमुळे आता पाठ फिरवू लागले आहेत. काय आहेत यामागची कारणं, जाणून घेऊयात...

राज्यातील अनेक पर्यटनस्थळांपैकी आंबोलीची एक वेगळी ओळख आहे. रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून तणावमुक्त होण्यासाठी पर्यटक आंबोलीला आवर्जून भेट देतात. हिरवा शालू पांघरलेल्या डोंगरकडा... आणि या डोंगरकड्यावरुन कोसळणारा पांढराशुभ्र धबधबा आणि खोल दरी आपल्या डोळ्यांचं पारणं फेडते... मात्र, निसर्गसंपन्न आंबोलीची ही ओळख आता पुसली जाऊन, तिला वेगळीच ओळख मिळू पाहतेय. 

निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलेले काही पर्यटक इथं दारु पिऊन उच्छाद मांडू लागलेत. मुलींची छेड काढणं, कुटुंबासह आलेल्या पर्यटकांना त्रास देणं, दारु पिऊन धिंगाणा घालणं हे प्रकार आता सर्रास होऊ लागलेत. याच दारुमुळे कावळेसाद धबधब्यावर नुकतेच दोन बळीही गेलेत. त्यामुळं कुटुंबासोबत अंबोलीला जावं की नाही, असा प्रश्न पर्यटकांना पडू लागलाय.

महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोव्यातूनही हजारोंच्या संख्येने पर्यटक आंबोलीला भेट देत असतात. त्यामुळे पार्किंगची मोठी समस्था इथं निर्माण होते. विकेंडला जवळपास 20 ते 25 हजार पर्यटक इथं येत असतात. मात्र, सुरक्षेसाठी अवघे पाच ते दहा पोलीस तैनात असल्यामुळे ते ही बघ्यांची भूमिका घेण्यापलिकडे काहीही करु शकत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अंबोलीची खास ओळख टिकवून ठेवण्याची आज गरज आहे.