मुंबईः गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस (Monsoon) पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात दमदार पाऊस बरसत आहेत. आज सकाळपासून मुंबईसह (Mumbai Rain) उपनगरात पावसाची संततधार सुरू आहे. तर, पुढील तीन दिवसांसाठी महाराष्ट्राला (Maharashtra Monsoon) यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने 17 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. (IMD Predict Yellow Alert In Maharashtra)
आज सकाळपासून मुंबई ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर येत्या काही दिवसांत कोकणात पुन्हा मान्सून सक्रीय होणार आहे. 4-5 दिवसांत मुंबई, कोकणासह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गोवा आणि सिंधुदुर्गात येत्या 3-4 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर, संपूर्ण राज्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील 3 दिवस मुंबई आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. आज पासून 17 जुलैपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी चांगला पाऊस पडणार आहे, अशी शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली आहे. तसंच, जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडेल, अशी माहिती कुलाबा वेधशाळेचे अधीकारी सुनील कांबळे यांनी दिली आहे.
कल्याण डोंबिवलीत गेल्या 4-5 दिवसांपासून पावसाचा लपंडाव सुरु होता. मात्र आज सकाळपासून कल्याण डोंबिवलीत ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस सुरु आहे. तर, दुपारनंतर अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत.
शुक्रवार सकाळपासून भिवंडीत पावसाने जोर धरला आहे. भिवंडी शहर आणि आजूबाजूच्या गावांत सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असून त्यामुळे सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील तीन बत्ती भागांत गुडघाभर पाणी भरले असून त्यातून वाट काढतांना नागरिकांची चांगलीच तारांबळ उडताना दिसतेय. त्याचप्रमाणे मार्केट परिसर आणि खाडी तसेच नदीलगतच्या इतर भागांत सुद्धा पाणी भरण्यास सुरुवात झाली.
गेले दोन दिवस वेंगुर्ले तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. आज सकाळपासून पडणाऱ्या पावसाने वेंगुर्ल्यातील जनजीवन विस्कळीत झालेले पाहायला मिळाले. वेंगुर्ला-सावंतवाडीला जोडणाऱ्या तळवडा येथील होडावडा पुलावर पाणी आल्याने सावंतवाडी वेंगुर्ला रस्ता वाहतुकीसाठी टप्प झालेला पाहायला मिळाला. सावंतवाडी वेंगुल्या रस्त्याची वाहतूक काही तास बंद झाली होती