Maharashtra Weather Forcast : कोल्हापूर, बुलढाणा या आणि अशा काही भागांना अवकाळीनं आणि सोसाट्याच्या वाऱ्यानं झोडपलेलं असतानाच आता राज्याचा 'ताप' वाढवणारी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. थोडक्यात आजचा दिवस उकाड्याचा असला तरीही काही भागांमध्ये मात्र तापमानात घट नोंदवण्यात येणार असून, पुढील तीन ते चार दिवस राज्यात कुठे उन्हाचा तडाखा तर, कुठे पावसाचा शिडकावा असं दुहेरी चित्र पाहायला मिळणार आहे. त्या दृष्टीनंच नागरिकांनी त्यांच्या दिवसाची आखणी करून मगच घराबाहेर पडावं असंही आवाहन करण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात सुरु असणारा उकाड्याचा कहर काही जिल्ह्यांमध्ये सुरुच राहणार असला तरीही काही जिल्हे, राज्यातील काही भाग मात्र यातून सुटकेचा नि:श्वास सोडणार आहेत. कारण, मान्सूनची सर्वांनाच प्रतीक्षा असताना महाराष्ट्रातील काही भागांमध्ये कमाल तापमानात तब्बल 4 ते 6 अंशांची घट नोंदवण्यात येईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
मुंबई शहर, कोकण किनारपट्टी आणि उपनगरांमध्ये उकाडा आणि आर्द्रतेचं प्रमाण जास्त असलं तरीही या भागांमघ्ये ढगाळ वातावरणामुळं उन्हाचा दाह कमी जाणवेल. शिवाय काही भागांत पावसाच्या हलक्या सरीही बरसतील. दरम्यान हा मान्सूनचा पाऊस नसला तरीही या तुरळक पावसानं नागरिकांना दिलासा मिळणार आहे हे मात्र नक्की.
पुढील 48 तासांमध्ये बंगालच्या उपसागराचा दक्षिण पट्टा, अंदमान आणि निकोबार बेट समुहाच्या काही भागात दक्षिण पश्चिम मान्सून वारे पुढे सरकण्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळं मान्सूनच्या वाटचालीला वेग मिळताना दिसत आहे. त्यातच देशाच्या पश्चिम हिमालय क्षेत्रामध्ये पश्चिमी झंझावात सक्रीय असल्यामुळं त्याचाही प्रभाव देशातील हवामानावर पडताना दिसत आहे.
सध्याच्या घडीला चक्रीवादळसदृश वारे मध्य पाकिस्तान आणि नजीकच्या क्षेत्रांवर घोंगावत आहेत. त्याचा प्रभाव बिहार, छत्तीसगढ, आणि इथं विदर्भातून मराठवाडा आणि कर्नाटकपर्यंत पोहोचल्याचं दिसत आहे.
पुढच्या 24 तासांमध्ये देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांच्या पर्वतीय भागांना पावसाचा तडाखा बसणार आहे. तर, काही भागांमध्ये हिमवृष्टीचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. पंजाबपासून राजस्थानपर्यंत बहुतांश भागांना पावसाचा तडाखा बसेल, तर काही ठिकाणी धुळीचं वादळही येण्याची शक्यता आहे.
लक्षद्वीप आणि अंदमान- निकोबार बेट समुहामध्ये पावसाच्या हजेरीसोबतच देशातील बहुतांश राज्यांमध्ये कमाल तापमानात 2 ते 3 अंशांची घट नोंदवण्यात येईल.