Monsoon News : मुंबईसह राज्याच्या कोकण किनारपट्टीवर तापमानात काहीशी घट झाली असली तरीही आर्द्रतेचं प्रमाण अधिक असल्यामुळं उकाडा मात्र कमी झालेला नाही. मध्य महाराष्ट्रातही चित्र वेगळं नाही. दरम्यान, पुढील दोन दिवस राजच्याच्या बहुतांश भागांवर प्रखर सूर्यप्रकाश पडणार नाही. कारण, राज्यावर काळ्या ढगांचं सावट असणार आहे. मान्सून अद्यापही महाराष्ट्रात पोहोचला नसला तरीही त्यांच्या आगमनाची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, नागपूर या भागांमध्ये सकाळच्या वेळी तापमानाच कोणत्याही प्रकारचे बदल अपेक्षित नसून, नागरिकांची उकाड्यातून सुटका नाही, हाच अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. तर, कोकणातील काही भागांमध्ये दमट वातावरणामुळं पावसाच्या तुरळक सरी बरसतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये शुक्रवारी अशाच पद्धतीनं पावसाचा शिडकावा झाल्याचं पाहायला मिळालं. ज्या धर्तीवर शनिवार आणि रविवारीसुद्धा बहुतांश भागांमध्ये पावसाची उपस्थिती नाकारता येत नाही.
मे महिन्याचे पहिले दहा दिवस वगळता त्यानंतर सुरु झालेला प्रचंड उकाडा आता आपली तीव्रता काही अंशांनी कमी करताना दिसत आहे. खासगी हवामान संस्था Skymet च्या अंदाजानुसार शुक्रवारी देशातील बऱ्याच भागांमध्ये तापमान 37 अंशांपर्यंत पोहोचलं असून, पुढील काही दिवस ते स्थिर राहील अन्यता किमान 2 अंशांनी त्यामध्ये घटही नोंदवली जाऊ शकते.
शनिवारी देशातील हवामानाचा अंदाज वर्तवायचा झाल्यास हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात धुळीचं वादळ येईल. पूर्वोत्तर भारतामध्ये मध्य स्वरुपाच्या पावसाची हजेरी असेल. तर, देशातील उत्तरेला असणाऱ्या पर्वतीय भागांमध्ये बर्फवृष्टीचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
IMD कडून मान्सूनच्या आगमनाबाबतची नवी माहिती सर्वांनाच दिलासा देऊन गेली आहे. कारण, मार्च- मे दरम्यान, मान्सूनपूर्व पर्जन्यमान चांगलं झाल्याचं निरीक्षण हवामान विभागान वर्तवलं. शिवाय केरळात मान्सून ठरल्याप्रमाणं 4 जूनलाच दाखल होईल असं सांगत यंदाच्या वर्षात मान्सूनचं प्रमाण सर्वसामान्य असेल असंही स्पष्ट केलं.
26 May: संपूर्ण देशभरात नैऋत्य मोसमी (जून ते सप्टेंबर) पाऊस सामान्य असण्याची शक्यता आहे (दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या 96 ते 104%)
परिमाणात्मकदृष्ट्या, संपूर्ण देशात नैऋत्य मोसमी (जून ते सप्टेंबर) पाऊस दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या 96% असण्याची शक्यता आहे,मॉडेल त्रुटी ± 4%.
- IMD— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 26, 2023
हवामान तज्ज्ञ आणि पुणे वेधशाळेचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनीही ट्विट करत मान्सूनबाबतची माहिती दिली. 'जूनमध्ये, दक्षिण भारतातील काही भाग, वायव्य भारत, अतिउत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भाग जेथे सामान्यपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे, वगळता देशातील बहुतांश भागांमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे', असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं.