नाशिकमध्ये ४ ते ५ ठिकाणी सापडली जिवंत काडतुसं

नाशिक शहरालगत महत्त्वाचं लष्करी ठाणं आहे, नोट प्रेस, धार्मिक स्थळं या शहरात आहेत. त्यामुळे या घटना गंभीर आहेत. 

Updated: Apr 26, 2018, 09:52 PM IST

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : गावठी कट्टे, जिवंत काडतुसे यांचं आगार म्हणजे नाशिक बनलंय. गेल्या काही दिवसांत नाशिकमध्ये चार ते पाच ठिकाणी जिवंत काडतुसं सापडली आहेत. दोनच दिवसांपूर्वी शहरात 22 जिवंत काडतुसं आणि गावठी कट्टे सापडले. काडतुसांची कॅपिटल अशी या शहराची ओळख होऊ लागलीय. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील गुन्हेगारीचा आलेख परत उंचावत आहे. त्यातच जिवंत काडतुसं आणि कट्टे सापडण्याच्या घटनांमुळे यात वाढच होतेय. नाशिक शहरालगत महत्त्वाचं लष्करी ठाणं आहे, नोट प्रेस, धार्मिक स्थळं या शहरात आहेत. त्यामुळे या घटना गंभीर आहेत. 

घरफोडी, खून, गाड्यांची तोडफोड, सोनसाखळी चोऱ्या या घटना नित्याच्याच होत असताना नाशिक पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय.  2017 या वर्षात 14 गावठी कट्टे आणि पिस्तुलं सापडली. तर 12 जिवंत काडतुसं सापडली. तर या वर्षात पहिल्या चार वर्षातच 10 गावठी कट्टे, 3 पिस्तुलं आणि 29 जिवंत काडतूसं सापडली आहेत. 

या घटनांमध्ये तरूण वर्गाची संख्या जास्त आहे. पूर्वी चाकू, गुप्ती अशी हत्यारं गुन्हेगार बाळगत होते. आता गल्लीतला दादाही गावठी कट्टा ठेवायला लागलाय. ही सामग्री यांच्यापर्यंत पोहोचते कशी हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर आहे. तरूणांचा या गुन्ह्यातला वाढता सहभाग चिंता वाढवणारा आहे. 

गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याविषयी काही वर्षांपूर्वी पोलीस महासंचालकांनी नाशिक पोलिसांचे कान खेचले होते... त्यानंतर पोलीस पुन्हा सक्रीय झाले होते. मात्र आता परत शहरातली गुन्हेगारी फोफावायला लागलीय. त्यामुळे पोलिसांचा वचक परत कमी झालाय की काय अशी टीका केली जातेय.