पुण्यातील समर कॅम्प दुर्घटनेप्रकरणी शिक्षकांवर गुन्हा दाखल

Updated: Apr 26, 2018, 11:37 PM IST

अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे : उन्हाळ्याच्या सुट्ट्य़ा आणि कँप यांचं अतूट नातं आहे. मात्र पुणे जिल्ह्यातल्या मुळशी इथल्या कातरखडक धरणात घडलेल्या दुर्घनेत तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झालाय. त्यामुळे समर कॅंपच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. या प्रकरणी आयोजक आणि शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. समर कॅम्पसाठी चेन्न्ईहून मुळशीतील कातरखडक येथे आलेल्या विद्यार्थ्यांसाठी समरकॅम्पचा पहिलाच दिवस हा आय़ुष्यातील अखेरचा दिवस ठरला. चेन्नईतील इसीएस मॅट्रिक्युलेशन स्कूलचे 20 विद्यार्थी मूळशी इथल्या कातरखडक इथे आले होते. 

जॅकलीन स्कूल ऑफ आर्टच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या कॅम्पमध्ये मुलांना विविध कलांचं प्रशिक्षण देण्यात येणार होतं... पहिल्या दिवसाचा वर्ग संपवून ही मुलं फिरण्यासाठी कातरखडक गावाच्या तलावाकडे गेली. पोहण्यासाठी म्हणून ही मुलं तलावात उतरली आणि याचवेळी गणेश राजा, संतोष के या विद्यार्थ्यांचा तलावात बुडुन मृत्यु झाला. 

मुळशी तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती आणि निसर्ग यामुळे इथे उन्हाळ्याच्या सुट्टीत मोठ्या प्रमाणात समर कॅम्प होतात. मात्र ब-याचदा या समरकॅम्पसाठी पोलिस आणि स्थानिक प्रशासनाची परवानगी घेतली जात नाही. चेन्नईहहून आलेल्या या विद्यार्थ्यांच्या समरकॅम्पसाठीही कोणतीही परवानगी घेतली नसल्याचं उघड झालंय. त्यामुळे एकूणच समर कॅम्प या प्रकाराबाबतच प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत. परवानगी नसताना  आयोजित करण्यात आलेल्या समरकॅम्पबाबत मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनीही आक्षेप घेतलाय.

उन्हाळ्याच्या दोन महिन्यांच्या लांबलचक सुट्टीत आपल्या पाल्याला छंदवर्ग आणि समरकॅम्पला पाठवण्याकडे बहुतांश पालकांचा कल असतो. व्यक्तिमत्व विकासाची अनेक प्रलोभन इथे दाखवली जातात. मात्र अशा समरकॅम्प आयोजकांनी सुरक्षेबाबत काय काळजी घेतलीय याची खातरजमा कोणीच करताना दिसत नाही. पालकांनी आपल्या पाल्यांना समरकॅम्पला जरूर पाठवावं मात्र योग्य ती खातरजमा केल्याशिवाय पाठवल्यास नको त्या प्रसंगांना तोंड देण्याची वेळ येऊ शकते हे ध्यानात घेणं गरजेचं आहे.