पुणे: खडकवासला धरण क्षेत्रात गेले काही दिवस दमदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणांमधील पाणी साठ्यात चांगली वाढ होत आहे. धरणसाखळीतील खडकवासला धरण ह् सर्वात लहान असल्यानं त्यातून पाणी सोडण्यात येत आहे. धरण क्षेत्रात असाच पाऊस सुरु राहिल्यास सगळी धरणं लवकरच भरण्याची अपेक्षा आहे. पुणेकर नागरिक तसेच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी ही खऱ्या अर्थानं आनंदाची बातमी ठरणार आहे.
दरम्यान, टेमघर, वरसगाव, पानशेत तसेच खडकवासला धरणातून पुणे शहराला पाणी पुरवठा होतो. या चारही धरणात मिळून ५९.७६ % पाणीसाठा झालाय . टेमघर धरण ४६.९१%, पानशेत ७३.४८, वरसगाव ४६.०८% तर खडकवासला धरण ९९.१६ % भरलय. गेल्या वर्षी आजच्या तारखेला या धरणांमध्ये मिळून ३८.५९% म्हणजे ११.२४ टीएमसी इतका राणीसाठा होता. यावर्षी या धरणांमध्ये १७.४२ टीएमसी म्हणजे ५९.७६ % पाणीसाठा झालाय.
मुंबई वगळता राज्यभर पावसाची संततधार सुरु आहे. रायगड जिल्ह्यतल्या महाड परिसरात पावसाची संततधार रात्रभर सुरु आहे. गांधारी,सावित्री या नद्यांच्या पातळीत झपाट्यानं वाढ होतेय. महाड शहरात पूर सदृश्य स्थिती निर्माण झालीय . महाड ते रायगड रस्त्यावर दोन फूटांपर्यंत पाणी आल्यानं किल्ल्याकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आलाय.
तिकडे महाबळेश्वरला गेल्या २४ तासात मुसळधार पाऊस पडलाय. कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसानं धरणाच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झालीय. इकडे लोणावळ्यातही गेल्या २४ तासात धुंवाधार पावसामुळे पवना धरण भरून वाहू लागलंय. कालपासून लोणावळा परिसरात २८५ मिलीमीटर पावसाची नोंद झालीय. अनेक सखल भागात पाणी आल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय.