औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज सकाळी ८.४५ च्या सुमारास मुळा आणि निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आलंय. जायकवाडीसाठी निळवंडे धरणातून ६००० क्युसेसने पाणी प्रवरा नदीपात्रात सोडलं जातंय. यासाठी निळवंडे धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आलेत.
गोदावरी नदीच्या धरण समूहातूनही सकाळी १० वाजता पाणी सोडण्यात येणार आहे. मात्र यामुळे मुळा, प्रवरा आणि गोदावरी नदीकाठच्या गावांचा वीज पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे या गावांची दिवाळी अंधारात जाण्याची चिन्हं आहेत.
निळवंडे धरणातून ३.८५ टीएमसी आणि मुळा धरणातून १.९० टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. निळवंडे धरणातून सुरवातीला ६००० क्यूसेकने पाणी सोडण्यात येणार आहे. नंतर चार तासांनी २००० क्यूसेक आणि पुन्हा ४ तासांनी २००० क्यूसेक असा १०,००० क्यूसेकने विसर्ग सोडण्यात येणार आहे. नंतर ३ ते ४ दिवसांनी विसर्ग कमी होत जाईल.
विसर्गा दरम्यान होणारा विरोध लक्षात घेता पोलिसांनी कठोर पोलीस बंदोबस्त ठेवलाय. त्यांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात येतंय. नदीतील प्रवाह जास्त असल्याने कुणीही नदीपात्रात उतरू नये, तसेच कुणाचे विद्यूत पंप जर नदीपात्रात असतील तर ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावेत, असंही आवाहन जलसंपदा विभागानं केलंय.