हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत, वाशिममध्ये ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी दिवस रात्र भटकंती

वाशिम जिल्ह्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दिवस रात्र भटकंती करावी लागत आहे.

Updated: Jun 1, 2024, 03:31 PM IST
हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत, वाशिममध्ये ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी दिवस रात्र भटकंती title=

Washim Water Crisis : वाशिम जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. आतापर्यंतच्या सर्वात उच्चांकी 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या तापमानामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. यामुळे जिल्ह्यातील जलसाठेही कोरडे पडले आहेत. परिणामी जिल्ह्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दिवस रात्र भटकंती करावी लागत आहे.

फक्त 14 टक्के जलसाठा शिल्लक

वाशिम जिल्ह्यात 171 जलसाठे आहेत. त्यात केवळ 14 टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. तर जिल्ह्यातील 81 गावांना तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. या 81 गावातील ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 74 ठिकाणाच्या खासगी विहीर आणि 8 बोअरवेल अधिग्रहण करण्यात आले आहेत. 

प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे

तर गंगापूर व वनोजा या दोन गावात टँकरने विहिरीत पाणी टाकून ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाई समस्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच ही पाणी टंचाई समस्या कायम स्वरुपी सोडवण्याची मागणी जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त भागातील नागरिक करीत आहे.

पाणी काढण्यासाठी जीवघेणी कसरत

वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील आदर्श गाव म्हणून वनोजा गावाची ओळख आहे. पण आता याच गावात विहीर आणि बोरवेल कोरडे पडले आहेत. पाण्याची गरज भागवण्यासाठी गावातील ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. शासनाकडून एका टँकरद्वारे गावात विहिरीत पाणी टाकले जातं आहे. पण हंडाभर पाण्यासाठी लहानापासून ते वयोवृद्ध व्यक्तींना विहिरीतून पाणी काढण्याचे जीवघेणी कसरत करावी लागतं आहे.

लोकसभेच्या मतदानापूर्वी नेत्यांनी मोठ-मोठे विकासाचे आश्वासन गावकऱ्यांना देण्यात आले. मात्र निवडणुका संपल्यानंतर नेत्यांनी पाणी टंचाईच्या समस्या सोडवण्यासाठी फिरुन पाहत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.