मुंबई : Abortion case :वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांकडून संबंधित डॉक्टर व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई व्हावी. घटनेच्या अनुषंगाने शहानिशा करुन गृहमंत्री तसेच गृह राज्यमंत्री यांना पत्राद्वारे या घटनेबद्दल माहिती दिली असल्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले आहे.
या प्रकरणात आर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील मदत करणारे, त्यांचे साथीदार यांचा शोध घेऊन त्यांना त्वरित अटक करण्यात यावी. कायदेशीर गर्भपात करण्यासंदर्भात जिल्हास्तरीय समिती असते. या समितीची बैठक प्रत्यक्ष किंवा दूरदृश्य प्रणालीमार्फत नियमित होणे गरजेचे आहे, अशी मागणी देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
#आर्वी (जि. #वर्धा) येथे अल्पवयीन मुलीचा #गर्भपात केल्याप्रकरणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित डॉक्टरसह इतर आरोपींना अटक केली. घटनेची शहानिशा करुन दोषींवर कडक कारवाई करण्याबाबत गृहमंत्र्यांना निवेदन दिले असल्याचे उपसभापती @neelamgorhe यांनी सांगितले आहे. pic.twitter.com/WDPSTv91Ma
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 14, 2022
महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत अखत्यारित येणाऱ्या सर्व खासगी रुग्णालयातील ‘जैव वैद्यकीय कचरा’किती होतो, किती प्रमाणात गोळा केला जातो याबाबतचा तपशील, अहवाल सर्व हॉस्पिटल यांनी संबंधित प्रशासनाला द्यावा. पीडितेला मनोधैर्य योजनेतून तात्काळ मदत मिळवून देण्यात यावी, अशा मागण्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत.
वर्ध्यामधील आर्वी येथे एका 13 वर्षांच्या मुलीचा गर्भपात केल्याचे उघड झाले आहे. कदम हॉस्पिटलमध्ये ( Kadam Hospital) हा सगळा प्रकार सुरु होता. 30 हजार रुपयांत कदम हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीररित्या गर्भपात केल्याची माहिती समोर आली. हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी हॉस्पिटल परिसरात शोध घेतला असता पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली. पोलिसांच्या तपासात हॉस्पीटलच्या गोबर गॅसच्या टाकीत 11 कवट्या आणि अर्भकाच्या हाडांचे 54 तुकडे सापडले होते. त्यानंतर तक्रार झाली.