औरंगाबाद : बाप्पाच्या आगमनापूर्वी मुसळधार पडलेल्या पावसानं पुन्हा एकदा मराठवाड्यात दडी मारली आहे. खरंतर गणेश उत्सवापूर्वी मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला. अनेक तालुक्यात अतिवृष्टी झाली त्यामुळं सरासरी गाठेल अशी अपेक्षा होती मात्र ही अपेक्षा फोल ठरली अजूनही मराठवाड्यात पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मराठवाड्याची वार्षिक सरासरी 779 मिमी इतकी आहे. मात्र आतापर्यंत फक्त 456 मिमी इतका पाऊस झाला आहे. 58.65 टक्के इतकाच पाऊस मराठवाड्यात झाला आहे.
मराठवाड्यातील धरण साठे अजूनही तहानलेले आहे, फक्त नगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस झाल्यानं जायकवाडी धऱणानं 81 टक्क्यांपर्यंत मजल मारली असली तरी बाकी धरणं अजूनही पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत. मराठवाड्यातील सर्व धरणातून एकून पाणीसाठा 40.51 टक्के इतका आहे.
पावसाअभावी तसाही खरीपाचा हंगाम वाया गेला होता मात्र मध्यंतरी पाऊस आल्यानं 40 टक्के पीक वाचवण्यात यश आलं होतं. मात्र पुन्हा पावसानं दडी मारल्यानं या पिकालाही धोका कायम आहे, तर रब्बीच्या पिकांसाठीही पाऊस महत्वाचा आहे. आतापर्यंत जो पाऊस अपेक्षित होता त्यापैकी 71 टक्के पाऊस मराठवाड्यात झाला आहे. म्हणजे पावसाची ही तूट 30 टक्क्यांच्या घरात आहे. त्यामुळं शेती आणि पिण्याच्या पाणी दोघांचाही प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात आला तरच मराठवाड्याची तूट भरून निघेल.