Pune Mosquito tornado: तुम्ही कधी वादळं पाहिलं आहे का? असं जर कोणी विचारलं तर तुम्ही हो पाहिलं आहे असंच उत्तर द्याल. पण ते कोणत्या प्रकारचं होतं असं विचारलं असता त्यात मच्छरांचं वादळ असं उत्तर कधी दिलं नसेल. कारण मच्छरांचं वादळ येईल किंवा ते असतं असा कधी विचारच आपण केला नसेल. पण पुणेकरांना चक्क मच्छरांचं वादळ अनुभवायला मिळालं असून यामुळे ते धास्तावले आहेत. कारण हे वादळ फार भयानक होतं आणि यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पुण्यात डासांचं वादळ आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत लाखो, करोडो डास हवेत दिसत आहेत. त्यांची संख्या इतकी होती की, आकाशापर्यंत त्यांच्या रांगा दिसत होत्या. मुठा नदीवर हे वादळ आल्याची माहिती आहे. तसंच हा व्हिडीओ केशवनगर आणि खर्डी परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
एक्स तसंच इंस्टाग्रामला अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत मुठा नदीकिनारी वसलेल्या टोलेजंग इमारतींवर डासांचे भलेमोठे वादळ घोंगावताना दिसत आहे. आकाशाच जणू काही डासांचे थवेच उडत आहेत असं या व्हिडीओत दिसत आहे. मध्य अमेरिका, रशिया अशा देशांमध्ये पावसाळ्यात हे डासांचं वादळ पाहायला मिळतं. तसंच काही ठिकाणी काही ठराविक ऋतूंमध्ये ते दिसतात. पण पुण्यासारख्या शहरात हे वादळ दिसणं दुर्मिळ प्रकार आहे.
Horrifying ‘mosquito tornado’ near Pune’s Keshav Nagar has sparked outrage, residents have demanded removal of hyacinths. Mosquito tornadoes like this have been reported from Central America and Russia usually during the rainy season.pic.twitter.com/n4SAwJlnzv
— Pune City Life (@PuneCityLife) February 10, 2024
काही रिपोर्टनुसार, सध्याच्या ऋतू मच्छरांसाठी योग्य प्रजननकाळ आहे. दरम्यान व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुणेकरांना आरोग्यासंबंधी चिंता सतावत आहे. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार बळावण्याची भिती पुणेकरांना आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनीही त्यावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, मॉस्किटो इलेक्ट्रिक रॅकेट हवेत फिरवण्याची गरज आहे. तर एकाने नेमकं यामागे कारण काय आहे? हे जाणकाराने समजावून सांगावं असं आवाहन केलं आहे. त्यावर एकाने उत्तर दिलं की "नद्या स्वयं-स्वच्छता करत असतात. त्यामध्ये डासांच्या अळ्या खाणारे प्राणी असतात. महानगरपालिका नदीत सांडपाणी टाकते आणि प्रदूषित करते, यामुळे जलकुंभाची अनियंत्रित वाढ होते ज्यामुळे नदीचा पृष्ठभाग डासांच्या उत्पत्तीसाठी पुरेसा आहे. हे ऐकायला मजेशीर वाटू शकतं, पण आजार बळावू शकतात”.
तसंच एकाने म्हटलं आहे की, "नदीकिनारी घर असणाऱ्या सर्वांसाठी आमची प्रार्थना. खिडक्या बंद करण्याची वेळ आली आहे.” एकाने स्पष्ट केले की, “सामान्यत: माणसांना लक्ष्य करणारे डास 25-फूट उंचीच्या मर्यादेतच राहतात. तथापि, काही प्रजाती उंचीवर किंवा झाडांमध्ये प्रजननाच्या पसंतीमुळे किंवा वाऱ्याच्या प्रवाहाने उंचावलेल्या अन्न स्रोतांचा शोध घेण्याच्या पसंतीमुळे जाऊ शकतात".