ससूनमधून पुन्हा आरोपी पळाला! गुंड शरद मोहोळच्या पत्नीला दिली होती धमकी

Pune Crime: मार्शल लीलाकर असे ससून मधून पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 11, 2024, 11:35 AM IST
ससूनमधून पुन्हा आरोपी पळाला! गुंड शरद मोहोळच्या पत्नीला दिली होती धमकी title=
marshal lilakar

Pune Crime: पुण्याच्या ससून रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या वॅार्ड क्रमांक 16 मधून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पळून गेला होता. यानंतर ससून रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.  या घटनेत राज्य सरकारमधील शिंदे गटाच्या मंत्र्यांचा सहभाग असल्याचा आरोप कॉंग्रेस आमदार रवींद्र धनगेकर यांनी केला होता. यामुळे राज्य सरकारच्या मंत्र्यांवरही मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा असा प्रकार समोर आला आहे. आणखी एक आरोपी ससून रुग्णालयातून पलायन करण्यास यशस्वी ठरला आहे. 

मार्शल लीलाकर असे ससून मधून पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकावल्याप्रकरणी हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान ससून रुग्णालयात असताना त्याने पोबारा केला आहे. आता याच्या पलायनामागे कोण आहे? याचा तपास घेतला जात आहे. मार्शल लीलाकरने सोशल माध्यमावरून रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळला धमकवले होते. याप्रकरणी पोलिसांनी लीलाकारला अटक केलं होतं.

काय आहे मोहोळ हत्या प्रकरण?

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने गोळ्या घातल्या. मुन्ना हा काही दिवसांपुर्वीच मोहोळच्या गॅंगमध्ये सामिल झाला होता. हळुहळू त्याने शरद मोहोळचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर वेळ साधून त्याने शरद मोहोळची हत्या केली होती. या घटनेनंतर पुण्यातील गॅंगवॉर समोर आले होते. 

शरद मोहोळचा खून करण्यापूर्वी आरोपींनी मुळशी तालुक्यातील हाडशी परिसरात गोळीबाराचा सराव केला होता, अशी माहिती समोर आली आहे.. शरद मोहोळचा खून झाला तेव्हा आरोपी नितीन खैरे हा मुन्ना पोळेकर यांच्यासह त्या ठिकाणी हजर होता. याशिवाय शरद मोहोळचा खून करण्यासाठी आरोपींनी एक महिन्यापूर्वीच कट रचला होता. 

पैशांची व्यवस्था

यासाठी जागा आणि वेळ कोणती निवडायची? संपूर्ण पैशाची व्यवस्था कशी करायची याचे सर्व प्लानिंग करण्यात आले होते. यामध्ये नितीन खैरे याने पैशांची व्यवस्था केली होती  तर आदित्य गोळे याने हत्येसाठी वापरण्यात आलेल्या बंदुकीसाठी पैसे पुरवले होते. या दोघांव्यतिरिक्त तिसरा आरोपीसुद्धा फोनद्वारे आरोपींच्या संपर्कात होता. तसेच या संपूर्ण कटात देखील तो सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणाचा छडा लावत आहेत.