अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या केडगावमध्ये दोघा शिवसैनिकांच्या झालेल्या हत्याकांडानं अवघा महाराष्ट्र हादरून गेलाय. याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यापाठोपाठ भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना अटक झालीय. कर्डिलेंना एका दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलीय. पण नगरमधील परिस्थिती अजूनही धुमसतेच आहे...
गंगाजल किंवा अपहरण सिनेमा तुम्ही पाहिलाय...? राजकीय आश्रयावर पोसलेल्या बिहारमधल्या गुंडगिरीची दाहकता दाखवणारे हे सिनेमे... पण गेल्या तीन दिवसांपासून नगरमधल्या केडगावमध्ये जे काही घडतंय, ते बिहारपेक्षा नक्कीच वेगळं नाही.
राजकीय वादात पार पडलेली केडगावची पोटनिवडणूक... निवडणुकीतील विजयानंतर दोघा शिवसैनिकांची गोळ्या झाडून केलेली हत्या... या हत्येमध्ये आमदारांचा असलेला कथित सहभाग... पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयावरचा हल्ला... आरोपी आमदाराला पळवून नेणं... हत्येच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी केलेलं आंदोलन आणि नगरबंदची दिलेली हाक... असा सगळा रक्तरंजित हिंसाचार पाहिल्यानंतर नगरमध्ये खरंच कायद्याचं राज्य आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
सत्ता कुणाचीही असो, इथं दहशत आहे ती कर्डिले, जगताप आणि कोतकर यांची... कोतकर काँग्रेसवाले, जगताप राष्ट्रवादीत तर कर्डिले भाजपात आहेत... पण तिन्ही कुटुंबाचे एकमेकांशी रोटीबेटी व्यवहार असून, गुंडशाहीला राजाश्रय देण्याचं काम इथं खुलेआम सुरू आहे.
दोघा शिवसैनिकांच्या हत्या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना रविवारी अटक करण्यात आलीय. त्यापाठोपाठ पोलीस अधीक्षक कार्यालयात तोडफोड केल्याच्या आरोपावरून भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांनाही सोमवारी अटक करण्यात आली. मात्र आपल्या बदनामीसाठी शिवसेनेनं राजकीय षडयंत्र आखल्याचा आरोप कर्डिलेंनी केला... तर शिवसेनेनं या आरोपाचा इन्कार केलाय.
दोघा शिवसैनिकांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली पाच पोलिसांचं विशेष पथक स्थापन करण्यात आलंय. याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. तूर्तास नगरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. पण राजकीय टोळक्यांची गुंडगिरी कायम असल्यानं अहमदनगरचं दहशतनगर झालंय, एवढं नक्की...