वरळीत ठाकरे विरुद्ध ठाकरे? आदित्य ठाकरेंविरुद्ध लढणाऱ्या मनसे उमेदवाराचं नावही आलं समोर

Vidhan Sabha Election 2024 Worli Constituency: आदित्य ठाकरे 2019 मध्ये पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढले. ते वरळीमधून आमदार म्हणून निवडून आले. मात्र आता त्यांना मनसे आव्हान देण्याच्या तयारीत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 14, 2024, 01:45 PM IST
वरळीत ठाकरे विरुद्ध ठाकरे? आदित्य ठाकरेंविरुद्ध लढणाऱ्या मनसे उमेदवाराचं नावही आलं समोर title=
मनसे वरळीतून देणार उमेदवार

Vidhan Sabha Election 2024 Worli Constituency: लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. राज्यातील सर्वच पक्ष विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठका, भेटीगाठींना सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी मात्र स्वबळाचा नारा दिला आहे. गुरुवारी मुंबईत झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी 225 ते 250 जागांवर लढण्याची तयारी ठेवण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. असं असतानाच आता वरळी या आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातून मनसेच्या संभाव्य उमेदवाराचं नाव समोर आलं आहे. 

मनसेचा उमेदवार कोण?

विधानसभेला वरळीमधून मनसेकडून संदीप देशपांडेंना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघातून मनसेकडून आव्हान दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वरळी विधानसभा मतदारसंघ असलेल्या लोकसभेच्या जागेवर ठाकरे गटाचे खासदार झालेल्या अरविंद सावंत यांचं मताधिक्य घटलं आहे. त्यामुळेच आता या संधीचा फायदा घेऊन थेट ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात उमेदवार देण्यासाठी मनेच्या हलचाली सुरु झाल्या आहेत. गेल्या वेळी मनसेने आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिलेला नव्हता. आदित्य ठाकरे हे 2019 ला पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढले होते. त्यामुळे त्यावेळेस त्यांच्या काकांचा पक्ष असलेल्या मनसेनं आदित्य ठाकरेंविरोधात कोणालाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं नव्हतं. मात्र आता मनसे आदित्य ठाकरेंविरुद्ध उमेदवार देण्याची तयारी करत आहे.

नक्की वाचा >> फडणवीसांच्या 'ठाकरेंना मराठी मतं मिळाली नाही'वरुन राऊतांचा टोला; म्हणाले, 'मुंबईत श्रीलंका, इराण..'

लोक मनसेची वाट पाहत असल्याचं राज यांचं विधान

"लोकसभा निवडणुकीत मनसैनिकानी चांगलं काम केलं म्हणून राज्यात महायुतीला चांगलं यश आले," असं राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना गुरुवारच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितल्याचं समजतं. उद्धव ठाकरेंना झालेलं हे मतदान मोदीविरोधातील मतदान आहे, असंही राज यांनी या बैठकीत म्हटलं. "राज्यातील फोडाफोडीचे राजकारण लोकांना आवडलं नाही. मोदी नको म्हणू (अँटी  मोदी) काहींनी महविकास आघाडीला मतदान केलं," असंही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या भाषणात म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नक्की वाचा >> 'शिवसेना-भाजपा युती तुटू नये अशी RSS ची भूमिका होती, पण मोदी-शाहांचा..'; खळबळजनक दावा

तसेच, "स्वबळावर 225 ते 250 जागा लढवण्यास तयार रहावे," असं राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे. या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान हे मराठी माणसाचं नसल्याचंही म्हटल्याचं समजतं. "मराठी माणूस आपण कधी रिंगणात उतरतोय याची वाट पाहतोय," असं म्हणत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जनता मनसेची वाट पाहत असल्याचं म्हटलं. त्याचप्रमाणे राज ठाकरेंनी लोकांच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल राग असल्याचं राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.