नागपूर: विरोधक अधिवेशनादरम्यान गोंधळ घालून कामकाजाचा वेळ वाया घालवत असल्याची टीका भाजपाकडून आजपर्यंत अनेकदा करण्यात आली आहे. मात्र, शुक्रवारी भाजपाचे मंत्रीही कामकाजाबाबत फारसे गंभीर नसल्याचे दिसून आले. शुक्रवारी विधानपरिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर १४ लक्षवेधी सूचनांवर चर्चा होणार होती. मात्र, या चर्चेला सुरुवात झाली तरी संबंधित विभागांचे चार मंत्रीच सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे सभागृहाचे कामकाज अडून राहिले. अखेर सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. त्यानंतर संबंधित मंत्र्यांना निरोप पाठवून बोलावण्यात आले.
अधिवेशनाचा एकूण खर्च पाहता सभागृहाच्या कामकाजासाठी प्रत्येक मिनिटाला साधारण ७० हजार रुपये इतका खर्च येतो. मात्र, भाजपाच्या मंत्र्यांना याची फारशी फिकीर नसल्याचे दिसून आले. अखेर निरोप देऊन बोलावल्यानंतर संबंधित खात्यांचे मंत्री सभागृहात अवतरले आणि कामकाजाला सुरुवातल झाली.