विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे साऱ्यांचं लक्ष

आमदारांकडून सभागृहात गदारोळ करण्यात आला आणि... 

Updated: Dec 1, 2019, 11:00 AM IST
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे साऱ्यांचं लक्ष  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : विधानसभेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आता पुढील राजकीय घडामोडींकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. एकिकदे विरोधी पक्षनेत्यांची निवड लांबणीवर पडलेली असतानात आता रविवारच्या दिवशी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदी नेमकी कोणाची वर्णी लागते याकडे साऱ्यांचं लक्ष राहील. दरम्यान, विश्वासदर्शक नवनियुक्त सरकारचा विश्वासदर्शक ठराव हा विधानभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मांडण्यात आला होता. 

शनिवारी हा ठराव मांडतेवेळी भाजप आमदारांकडून सभागृहात गदारोळ आणि घोषणाबाजी केली गेली. ज्यानंतर त्यांनी सभात्यागही केला. गदारोळ आणि बहुमत चाचणी असं एकंदर चित्र दिसल्यानंतर रविवारचा दिवसही काही महत्वाच्या घडामोडींचा असेल. संयुक्त सभागृहात राज्यपालांचे अभिभाषण होईल तर, विधान परिषदेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या मंत्र्यांचा परिचय करून देतील आणि राज्यपालांच्या विवासनाची प्रत पटलावर ठेवली जाईल. 

अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट 

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. काँग्रेस विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहे. काँग्रेसकडून साकोलीचे आमदार नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीच्या रिंगणात ते असणार आहेत. त्यांना भाजपच्या किसन कथोरे यांचं आव्हान असणार आहे. ज्येष्ठ सदस्य म्हणून भाजपनं कथोरेंना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे आता कथोरे आणि पटोले यांच्या सामना होणार आहे. मात्र महाविकास आघाडीकडे संख्याबळ जास्त असल्यामुळे पटोलेंचा विजय निश्चित मानण्यात येत आहे.  

विरोधी पक्षनेत्यांची निवड लांबणीवर 

विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड लांबणीवर पडली आहे. शनिवारी विधानसभेच्या कामकाजात विरोधी पक्षनेत्याच्या निवडीचा समावेश करण्यात आला नाही. त्यामुऴं रविवारी फक्त विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. विरोधकांनी पहिल्या दिवशी जी आक्रमक भूमिका घेतली होती त्याला उत्तर म्हणून सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेत्याची निवड लांबणीवर टाकण्याची खेळी केली आहे. विरोधी पक्षनेत्याची निवड आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात होणार आहे. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या आक्रमक रणनितीला उत्तर दिलं असल्यामुळे याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटण्याची शक्यता आहे.