विधानपरिषद निवडणूक बिनविरोध, महाविकासआघाडीत असा निघाला तोडगा

महाविकासआघाडीतल्या नाराजीवर अखेर पडदा

Updated: May 10, 2020, 09:31 PM IST
विधानपरिषद निवडणूक बिनविरोध, महाविकासआघाडीत असा निघाला तोडगा title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आमदार बनवणारी विधानपरिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध होणार आहे. काँग्रेसने त्यांच्या एका उमेदवाराचा अर्ज मागे घेतल्यामुळे आता सगळे ९ उमेदवार विधानपरिषदेवर जाणार आहेत. पण सुरुवातीला काँग्रेस २ जागांवर ठाम असल्यामुळे महाविकासआघाडीत नाराजीनाट्य पाहायला मिळालं. काँग्रेस दुसरा उमेदवार उभा करणार असेल, तर आपण निवडणुकीला उभे राहणार नाही, असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला होता.

उद्धव ठाकरेंनी दिलेल्या या इशाऱ्याबाबत शिवसेना नेत्यांनी माध्यमांना सांगितल्याबद्दल काँग्रेसने नाराजीही बोलून दाखवली. अखेर महाविकासआघाडीच्या नेत्यांमध्ये बैठक झाल्यानंतर काँग्रेसने दुसरा उमेदवार मागे घ्यायचं ठरवलं. काँग्रेसने उमेदवार मागे घेण्यासाठी पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्या.

असा निघाला तोडगा

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध व्हावी, म्हणून शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी पुन्हा एकदा महत्त्वाची भूमिका बजावली. यापूर्वी विधानपरिषदेची निवडणूक जाहीर व्हावी, यासाठी नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांनी राजभवनावर जाऊन शिष्टाई केली होती. नार्वेकर यांनी दोनदा बाळासाहेब थोरात यांच्याशीही चर्चा केली.

बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंनी दिलेला निर्वाणीचा निरोप थोरातांना दिला. आज अखेर काँग्रेसचे दिल्लीतील नेते अहमद पटेल आणि वेणूगोपाल यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. यानंतर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध व्हायचा मार्ग सुकर झाला.

विधानपरिषदेची एक जागा सोडून काँग्रेसनं बरच कमावलं

विधानपरिषदेवर कोणाची वर्णी?

शिवसेना

शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांची नावं निश्चित झाली आहेत, पण नीलम गोऱ्हे यांच्या नावाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस

शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी

काँग्रेस

राजेश राठोड

भाजप 

प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील