पुणे विद्यापीठात रामयणावरुन राडा! सीतेला धुम्रपान करताना पाहताच...; Video आला समोर

Pune University Lalit Kala Kendra ABVP Issue Over Ramleela: पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामधील ललित कला केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या या नाटकामधील संवाद आणि दृष्यांवर आक्षेप घेत नाटक बंद पाडलं. या घडामोडींचा व्हिडीओ समोर आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 3, 2024, 10:18 AM IST
पुणे विद्यापीठात रामयणावरुन राडा! सीतेला धुम्रपान करताना पाहताच...; Video आला समोर title=
शुक्रवारी पुणे विद्यापीठात झाला राडा

Pune University Lalit Kala Kendra ABVP Issue Over Ramleela: पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील ललित कला केंद्रामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटकावरुन तुफान राडा झाला. ललित कला केंद्र विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असा वाद 'जब वी मेट' नावाच्या नाटकावरुन निर्माण झाला आहे. रामायणावर आधारित या नाटकामध्ये काम करणाऱ्या कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य दाखवण्यात आलं होतं. यादरम्यान असलेल्या संवादांवर आक्षेप घेत कलाकारांना मारहाण करण्यात आली. 

नक्की घडलं काय?

ललित कला केंद्रात विद्यार्थी असलेल्या भावेश राजेंद्रन नावाच्या विद्यार्थ्याने या नाटकाचं दिग्दर्शन आणि लेखन केल्याची माहिती समोर येत आहे. या नाटकातील संवादांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी नाटकाचा प्रयोग उधळून लावला. विद्यार्थ्यांना अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मारहाणही केली. या राड्यानंतर विद्यापीठामध्ये पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या नाटकामध्ये गोंधळ झाला तेव्हाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमधील दृष्यांमध्ये रामायणातील पात्रांच्या वेशातील पात्र सध्याच्या भाषेत बोलताना दिसत आहेत. तसेच स्टेजवर असलेल्या सीता मातेचं पात्र साकारणी अभिनेत्री धुम्रपान करताना दिसत आहे. नाटकातील हा प्रसंग सुरु असतानाच अभाविपच्या कार्यकर्त्यांनी नाटक बंद पाडलं.

तणाव निर्माण झाला

नाटकातील संवाद ऐकून अभाविपच्या कार्यकर्त्यांनी हिंदू देवी-देवतांचा अपमान केला जात असल्याचा आरोप करत नाटक बंद पाडल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी स्टेजवर चढून नाटक बंद पाडल्यानंतर एकच गोंधळ उडाली. ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना विरोध केल्याने थोडा वेळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला. दोन्ही बाजूच्या तरुणांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे. 

अभाविपचं म्हणणं काय?

सदर नाटकामध्ये वादग्रस्त संवाद आणि प्रसंग होते असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी आघाडी असलेल्या अभाविपने केला आहे. या नाटकाची संहित उपहासात्मक होती अशी माहिती समोर येत आहे. अभाविचे पुणे विद्यापीठातील प्रमुख शिव बरोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाटकामध्ये सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री मंचावर धुम्रपान करताना आणि लक्ष्मणाची भूमिका साकारणारा अभिनेता आक्षेपार्ह भाषा वापरताना दाखवण्यात आला होता.

पोलिसांत तक्रार दाखल केली

बरोलेंनी दिलेल्या माहितीनुसार, या नाटकावर आम्ही आक्षेप नोंदवला आणि नाटक बंद पाडलं. हे नाटक हिंदूंच्या भावना दुखावणारे आहे. आम्ही नाटक बंद पाडल्यानंतर ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला धक्काबुक्की केल्याचा आरोप बरोलेंनी केला. आम्ही या प्रकरणामध्ये पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली आहे.